सातारा -सातारा शहरात तीन तर सातारा तालुक्यात चार असे एकदम सात बाधित रुग्ण आढळल्याने आवश्यक उपाययोजनांसाठी आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली. गुरुवार पेठेतील वृद्धा व रविवार पेठेतील होलसेल भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सहा कंटेनमेंट झोन जाहीर करून रस्त्यावर भरणाऱ्या मंडईंना मनाई हुकूम जारी केला.
प्रांत मिनाज मुल्ला यांनी तातडीची बैठक घेऊन आरोग्य यंत्रणेला झोन व उपाय योजनां संदर्भात सूचना केल्या. दिवसभरात सातारा तालुक्यात सात रुग्णांच्या संपर्कातील 52 जणांना क्वारंटाइन करण्यात आले. भाजी विक्रेत्याच्या कुटुंबातील 11 जणांना “हाय रिस्क’अंर्तगत हलवण्यात आले. निसर्ग कॉलनी जरंडेश्वर नाका येथील 48 वर्षीय जिल्हा रुग्णालयातील परिचारकेला बाधा झाल्याने तिच्या संपर्कातील नऊ जणांना क्वारंटाइन करण्यात आले.
शाहूनगरमधील दूरसंचार कार्यालयालगत असलेल्या आदर्श कॉलनीमधील एका घरातील बाधित युवक जिहे येथे सापडलेल्या बाधिताच्या निकट संपर्क आल्याचे सांगण्यात आले. करंजे येथील 40 वर्षीय व्यक्तीला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. ठाणे येथून आलेली ही व्यक्ती एसटी कर्मचारी आहे. त्याने स्वतःहून विलगीकरण कक्षात दाखल झाला होता. त्याचा अन्य कोणाशी संपर्क आला नाही. त्यामुळे करंजे परिसरातील भीतीचे वातावरण निवळले.
अपशिंगे येथील 18 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जैतापूर येथील 30 वर्षीय युवक मुंबई वारीनंतर बाधित असल्याचे स्पष्ट झाले. धनगरवाडी येथील 14 वर्षीय मुलगी मुंबई प्रवासानंतर बाधित झाली आहे. तर खावली येथील 46 वर्षीय रुग्ण “सारी’ने बाधित असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी सांगितले.
शहरातील मंडई बंदचे आदेश
शहरातील करोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सातारा शहर व त्रिशंकू भागातील मंडई बंद करण्याचे आदेश गुरुवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्यानंतर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी परिपत्रक जारी केले. घरपोच मंडईची व्यवस्था यापूर्वी निर्धारीत होती, तीच कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय किराणा मालाच्या दुकानात जर सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नाही तर कठोर कारवाईचा इशारा पालिकेच्या कोविड कक्ष प्रमुखांनी दिला आहे .