नवी दिल्ली : भारत-चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेहला भेट दिली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी सैनिकांचे मनोबल वाढवण्याबरोबरच भारत-चीन सीमेवरील सुरक्षा उपाय योजनांचा आढावा घेणार असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित आहेत.
पंतप्रधान सकाळी लेहमध्ये पोहोचले आणि जवानांची भेट घेतली. महत्त्वाचे म्हणजे याआधी फक्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचाच लेह दौरा पूर्वनियोजित होता. मे महिन्यापासून सीमेवर चीनसोबत तणाव सुरु असून परिस्थिती गंभीर आहे. त्यातच पंतप्रधान मोदीही त्यांच्यासोबत लेहमध्ये पोहोचल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला.
PM Narendra Modi reaches Ladakh.
Surprise visit after stand-off in eastern #Ladakh pic.twitter.com/20oVoMOHbo— All India Radio News (@airnewsalerts) July 3, 2020
याआधी आज केवळ सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह लेहला जाणार होते. परंतु गुरुवारी त्यांच्या कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आला. तेव्हा फक्त बिपिन रावत लेहमध्ये जातील असे ठरले होते. मात्र आज बिपिन रावत यांच्यासोबत मोदीही लेहमध्ये दाखल झाले. निमू येथील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची मोदींनी भेट घेतली आहे. येथील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला असून नक्की या परिसामध्ये कशापद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मोदींना दिली.
लडाख सीमेवर तणाव सुरु असतानाच 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यामध्ये भारताच्या कमांडिंग ऑफिसरसह 20 जवान शहीद झाले होते. तर काही जवान जखमीही झाले होते. या झटापटीत चीनचंही नुकसान झाल्याचं म्हटलं जातं, परंतु चीनने आकडे जारी केलेले नाहीत. या घटनेनंतर तणाव सातत्याने वाढत गेले आणि दोन्ही सैन्याच्या वरिष्ठ स्तरावर बातचीतही झाली. परंतु अद्याप कोणताही मार्ग निघू शकलेला नाही. तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख एम एम नरवणे यांनीही लेहचा दौरा केला होता. गलवान खोऱ्यातील झटापटीत जखमी झालेल्या जवानांची त्यांनी भेट घेतली होती.