- लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून कारवाई
कार्ला – लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 827 जणांवर कलम 188 अन्वेय गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिली. तर विनामास्क व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 3266 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
लॉकडाऊन काळात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली होती. असे असताना देखील बिनधिक्तपणे फिरणाऱ्या 827 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तर कार्ला, मळवली, वेहेरगाव, कुसगाव, ओळकाईवाडी व पवनानगर परिसरात 29 ठिकाणी दारूबंदीची कारवाई करत 18 लाख 18 हजार 418 रुपयांचा माल जप्त केला. पाच ठिकाणी जुगार अड्ड्यांवर कारवाई करत 1 लाख 3 हजार 191 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
अनलॉकच्या प्रक्रियेत पर्यटनबंदी असताना देखील लोणावळा ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी गर्दी करणारे, मास्क परिधान न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन, वाहतूक नियमांचा भंग आदी प्रकारच्या 2250 कारवाया करत 4 लाख 62 हजार 700 रुपयांचा दंड ग्रामीण पोलिसांनी तर 1016 जणांकडून 3 लाख 56 हजार 300 रुपयांचा दंड ग्रामपंचायतींच्या मदतीने वसूल केला असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक नवनित कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रणावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरसोली टोलनाका, मळवली, कार्ला फाटा, दुधीवरे खिंड, पवनानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.