नवी दिल्ली – कोलकत्यातील शैक्षणिक केंद्र असलेल्या कॉलेज रस्त्यावर ट्राम लायब्ररी चालवण्यात येणार आहे. गुरुवारी या लायब्ररीचे उद्घाटन झाले. कोलकत्यातील अशा प्रकारची ही पहिलीच लायब्ररी आहे.
वाचनालयाला योग्य अशी अंतर्गत रचना असलेल्या या ट्राममध्ये पुस्तके, मासिके याबरोबरच स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. नागरी सेवा परिक्षा, जीआरई, जीमॅट अशा परिक्षांसाठी उपयुक्त पुस्तके इथे आहेत.
ही ट्राम श्यामबझार ते एस्पेलन्ड या 4.5 किलोमीटर अंतराच्या मार्गावर चालणार आहे. याच रस्त्यावर कोलकत्यातील 30 हून अधिक शैक्षणिक संस्था व महाविद्यालये आहेत. त्यामध्ये कलकत्ता विद्यापीठ, प्रेसिडेन्सी विद्यापीठ, स्कॉटिश चर्च कॉलेज, हिंदू स्कूल, हरे स्कूल, कलकत्ता गर्ल्स स्कूल अशा संस्थांचा समावेश आहे.
या ट्राममध्ये मोपत वायफायची सुविधा असल्याने हातात पुस्तक धरून वाचण्यापेक्षा ई-बुक्स देखील वाचता येतील. या वाचनालयात नियमितपणे नवनवीन मासिके आणि पुस्तके ठेवण्यात येणार आहेत.
यापुढे ट्राम लायब्ररीमध्ये वाचन कट्टे, पुस्तक प्रकाशन, साहित्य मेळावे घेण्याचा ट्राम प्रशासनाचा विचार आहे. हे सगळे यशस्वी झाले तर कोलकत्यात 1902 पासून सुरु असलेल्या ट्रामसेवेला नवा आयाम प्राप्त होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
ट्राम लायब्ररीप्रमाणेच कोलकत्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील आणखी एक वेगळा उपक्रम म्हणजे बान्सद्रोणी ते बाबुघाट मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक 205 आणि 205-अ या गाड्यांमध्ये ट्रान्सजेंडर प्रवाशांसाठी एक सीट राखून ठेवण्यात आली आहे. या आसनाला `त्रिधारा` असे नावही देण्यात आले आहे.