- आता तरी जाग येणार का ?
चऱ्होली – भोसरीतील इंद्रायणीनगर येथे रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) स्फोटात एकाच कुटुंबातील आजीसह नातीचा व चिमुकलीच्या आईचा मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांत निष्काळजीपणा करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यामुळे महावितरणच्या डीपी, ट्रान्सफॉर्मर तसेच इतर विद्युतविषयक गोष्टींच्या दुरुस्ती आणि देखभालीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
महावितरणने देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत करणे अपेक्षित आहे. ही कामे केली जात असल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करीत असले तरी स्थानिक पातळीवर आलबेल कारभार असल्याचे पाहायला मिळत आहे. भोसरीतील घटनेमुळे महावितरणचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. महावितरणकडून रोहित्राची तपासणी, त्याचे आर्थिंग व टर्मीनल कनेक्शन चेक करणे, ऑइलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी, खांब आणि ताराचे मजबुतीकरण, गंजलेले वीजखांब बदलणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे आदी कामांचा समावेश आहे. मात्र, यातील अनेक दुरुस्ती कामे केवळ वरवरच केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. शहरासाठी एकच विद्युत निरीक्षक वीजपुरवठा करणारी यंत्रणा सक्षम आणि सुरक्षित आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी केवळ एकच विद्युत निरीक्षक असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे विद्युतविषयक गोष्टींच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी तपासणी सक्षम यंत्रणाच पुरेशा प्रमाणात कार्यान्वित नसल्याने मोठे अपघात होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. क्वॉलिटी आणि कंट्रोल विभाग केवळ कागदावरच असल्याने कुचकामी वीजपुरवठा यंत्रणेवर नियंत्रण कसे ठेवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात रोहित्रांना वेलींचा विळखा
पिंपरी-चिंचवड शहरात व उपनगरांमध्ये सर्रास रोहित्रांना वेलींचा विळखा पडलेला दिसून येत आहे. परंतु महावितरण याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. शहरात वारंवार रोहित्रांचे स्फोट होण्याच्या घटना घडत आहेत. तरीदेखील महावितरण रोहित्रांची देखभाल करत नाही. त्यामुळे भोसरी इंद्रायणीनगर घडनेची पुन्हा पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. चिखली, मोरेवस्ती, जाधववाडी, भोसरी, दिघी, सांगवी तसेच वाल्हेकरवाडी आदी परिसरातील रोहित्रांना वेलींचा विळखा पडला आहे. परंतु महावितरण या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करताना दिसून येत आहे.