पिंपरी – घराच्या स्लॅबवरील पत्र्यावर झालेला कचरा काढण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर त्याला वाचविण्यासाठी गेलेली त्याची आई जखमी झाली आहे. ही घटना बोऱ्हाडेवाडी येथील वाघेश्वर कॉलनीत शुक्रवारी (दि.11) सकाळी अकरा वाजता घडली. अस्वनी जितेंद्र भगत (वय 8) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याची आई मीनूदेवी जितेंद्र भगत (वय 30 रा. वाघेश्वर कॉलनी, बोऱ्हाडेवाडी, मोशी) या अपघातात जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोलमजुरी करुन भगत कुटुंबीय आपली गुजराण करीत होते. आज सकाळी अकराच्या सुमारास घराच्या स्लॅबवरील पत्र्याची स्वच्छता करण्यासाठी अस्वनी हा पत्र्यावर गेला होता. पत्र्याजवळ असलेल्या 22 केव्हीए क्षमतेच्या वीजवाहिनीला त्याचा स्पर्श झाला. वीजेचा धक्का बसून, त्याचा मृत्यू झाला तर त्याची आई मीनुदेवी या अपघातात जखमी झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
–