सातारा -शहर व परिसरात भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या 25 वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामूहिक अत्याचार तर दोघांनी विनयभंग केल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच नम्या यंत्र्या भोसले, मयूर नागेश काळे (दोघे रा. फडतरवाडी, ता. सातारा), किरडेट आशीर्वाद पवार (रा. गोगावलेवाडी, ता. कोरेगाव), भगत काप्या काळे (रा. बारटक्के चौक, सातारा) या चौघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरामध्ये भीक मागत असलेली 25 वर्षीय महिला शनिवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजता तिच्या लहान मुलीसमवेत रहिमतपूर रस्त्यावर उभी होती. यावेळी संशयित दोन दुचाकींवरून तेथे आले. “तुला व तुझ्या मुलीला घरी सोडतो,’ असे म्हणून दोघींना दुचाकीवर बसविले. त्यानंतर ते दुचाकीवरून घरी निघाले.
मात्र, जैतापूर गावच्या हद्दीतील पुलाजवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबविली. पीडित महिलेला ओढत रस्त्याकडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली नेले. येथे नम्या भोसले आणि मयूर काळे या दोघांनी त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केला. तर किरडेट पवार आणि भगत काळे या दोघांनी पीडित महिलेसोबत अश्लिल कृत्य करून घडला प्रकार कोणाला सांगितला तर मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पीडित महिला आणि तिच्या मुलीला तिच्या घराजवळ सोडण्यात आले. यानंतर संशयित तेथून पसार झाले.
परंतु, पीडित महिलेने या प्रकाराची सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून रविवारी रात्री चारही संशयितांना अटक केली. महिला पोलीस उपनिरीक्षक डी. डी. मुसळे तपास करीत आहेत.