सिंहगड रस्ता –पालकांना आर्थिक बाबतीत वेठीस धरून विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद केले. तसेच, संस्थेच्या लेखापरीक्षणात “एज्युकेशन कॉन्ट्रीब्युशन’ या नावाखाली 2 कोटी रुपये खर्च दाखविला असून त्याचा तपशील दिलेला नाही. शाळेने ना हरकत प्रमाणपत्रातील अटींचे पालन केलेले नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवून आता पूर्ण शुल्काची मागणी करीत आहे. चौकशीसाठी संस्था व शाळा सहकार्य करीत नसल्याचे शिक्षण विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित शिवणे आणि फुरसुंगी वॉलनट शाळेवर कारवाई करावी, असे निर्देश पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शाळेसंदर्भात पालकांकडून शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर शिक्षण विभागाने एक समिती नेमून चौकशीचे आदेश दिले होते. समितीने केलेल्या तपासणीमध्ये वॉलनट शाळेने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद ठेवले, 2019/20 या वर्षाचा निकाल मेलद्वारे पाठवित मूळ निकालाची प्रत अद्याप दिली नाही, आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून दिले जाते मात्र इतर शुल्क भरले नाही म्हणून या विद्यार्थ्यांनासुद्धा ऑनलाइन शिक्षण दिले नाही याबाबी निष्पन्न झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
माझी दोन मुले शाळेमध्ये शिकत आहेत. जून 2020 पासून शुल्क भरले नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले. करोनाकाळात एक रकमी शुल्क भरणे शक्य नसल्यामुळे हप्त्याची सुविधा द्यावी, असे वारंवार अर्ज केले. आमची शुल्क भरण्याची तयारी आहे. परंतु, शाळेने अद्याप आम्हाला लिंक किंवा बॅंक डिटेल दिलेले नाहीत.
– दीपाली किरण सरदेशमुख, तक्रार अर्जकर्ते पालक
विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आरटीई अंतर्गत अनियमितता, नफेखोरी करणे, विद्यार्थी पालकांना वेठीस धरणे अशा बाबी वॉलनट शाळेच्या चौकशीदरम्यान समोर आल्या. त्यामुळे संबंधित शाळेवर कारवाई करावी, असा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयला दिला आहे.
– औदुंबर उकिरडे, शिक्षण उपसंचालक पुणे विभाग.
वॉलनट शाळेबद्दल बऱ्याच पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. पालकांनी थोडा संयम ठेवावा, त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. वॉलनट शाळेने बऱ्याच अनियमित गोष्टी केल्या आहे, याची आम्ही वारंवार शिक्षण विभागाकडे तक्रार आणि पाठपुरावा करत आहोत.
– दत्तात्रय पवार, जयश्री देशपांडे, “महापेरेंट संघटना’
सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यामुळे तुमच्याशी बोलता येणार नाही. शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामातून त्यांनी त्यांचे जे काही म्हणणे मांडले आहे, त्यानुसार आम्ही संबंधित विभागांना आमची बाजू योग्या त्या कागदपत्रांसह कळविली आहे.
– मंजिरी भिडे, व्यवस्थापिका, वॉलनट शाळा