पैठण : पैठण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील निष्ठावंत माजी आमदार संजय वाघचौरे यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेला एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी रद्द ठरवला. तर शिवसेना ते राष्ट्रवादी व्हाया भाजप असा प्रवास करणाऱ्या दत्त गोर्डे यांना उमेदवारी पक्की झाली आहे.
उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी शनिवारी (ता. पाच) केली. यावेळी छाननी प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वाघचौरे यांचे नामनिर्देशनपत्र रद्द करण्यात आले. गोर्डे यांची आमदार संदीपान भुमरे यांनी पक्षविरोधी कारवाया करीत असल्याची तक्रार शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करून शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. यानंतर गोर्डे यांनी भाजपमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन प्रवेश केला. युती झाल्यामुळे त्यांनी भाजपशी फारकत घेतली व मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळीच गोर्डे यांना पक्षक्षेष्ठींनी पक्षाचा एबी फॉर्म दिला. यानंतर वाघचौरे यांनी समर्थकांसह उमेदवारीची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांनाही एबी फॉर्म दिला. मात्र, वाघचौरे यांचा एबी फॉर्म रद्दबातल ठरविला.