मुंबई : आरे’तील वृक्षतोडीबाबत आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राज्यभर असंतोषाचा भडका उडाला. बारामतीत दोन बस फोडण्यात आल्या. जालन्यातही निदर्शने करण्यात आली. राज्यभर वंचितच कार्यकर्ते संतप्त झाले असून ठीक ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.
मुंबईत मेट्रो कारशेडसाठी आरेतील हजारो झाडे रात्रीत तोडण्यात आली आहेत. आजवर मुंबईला श्वास देणारी ही हिरवाई अखेर संपुष्टात येणार आहे. त्या विरोधात मुंबईत विविध संघटनांच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. त्यांना या प्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतले.
जालन्यात निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परीसर दणाणून सोडला. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देखील घोषणाबाजी करत आंबेडकर यांच्या अटकेचा निषेध केला.
आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे अकोल्यातही पडसाद पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील अशोक वाटिका चौकात रास्ता रोको करून सरकारचे पुतळे जाळले.