छत्रपती संभाजीनगर – राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय नेतेमंडळी प्रचारात व्यक्त आहेत. तर, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे हे निवडणुकांच्या राजकारणापासून दूर आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होताच, ते आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना तत्काळ बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. अचानक तब्बेत खालावल्यामुळे मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने गाठीभेटी दौऱ्यात बीड जिल्ह्याचा दौरा सुरू असतानाच अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे, मनोज जरांगे बीड दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू करण्यात आले आहेत.