नागपूर : नवोदय बॅंकेतील 38 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी बॅंकेचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे माजी आमदार अशोक धवड यांना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले होते. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 13 नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडीची शिक्षा ठोठाविण्यात आली.
नवोदय बॅंक घोटाळा प्रकरणात माजी आमदार अशोक धवड यांच्यासह जवळपास चाळीसहून अधिक जणांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठेवीदार श्रीकांत सुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धंतोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. बॅंकेतून 2014मध्ये सुमारे चार कोटी 3 लाख रुपये बेकायदा काढण्यात आले. तसेच बनावट कागदपत्रांद्वारे हा पैसा परत जमा केल्याचे दाखविण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकारे सुमारे 38 कोटी 75 लाख रुपयांचा गैरप्रकार बॅंकेत झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यत एकूण 14 आरोपींना अटक केली आहे.