बारामती : बारामती शहर व तालुक्यात आज सहा पूर्ण संक्रमित रुग्ण असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. बारामतीत कोरोना संक्रमितांचा आलेख वाढला असून बारामतीकरांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील अशोकनगरमधील एका वकिलांच्या पत्नीसह शहरातील ज्येष्ठ नगरसेवकांचा मुलगा व तांबेनगरमधील एक रहिवासी आज कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच, कोरोनाग्रस्त झालेल्या आयटी अभियंत्याचे तालुक्यातील काटेवाडी येथील दोन मित्रही आज पॉझिटीव्ह निघाले, तर सावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुणे शाखेत कार्यरत एक कर्मचारीही पॉझिटीव्ह निघाला. बारामती तालुक्यात एकूण सहा जण आज कोरोनाबाधित आढळले आहेत.
कोरोना मुक्त शहराला पुन्हा कोरोनाचा विळखा पडत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाला तातडीने कोरोना केअर सेंटर करून येथील सर्व कामकाज एमआयडीसीतील महिला रुग्णालयातून करण्याचे निर्देश पवार यांनी आरोग्य विभागास दिले आहे.
लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर आणि सॅनेटायझरचा वापर करावा, अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत कडक उपायोजना अवलंब करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.