कोपर्डे हवेली – नडशी कॉलनी ता. कराड येथे 34 वर्षीय महिला बाधित सापडल्याने परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. तीन महिन्यांपूर्वी येथील रेल्वे कर्मचारी संशयित आढळला होता. तो निगेटिव्ह ठरला पण आता करोनाने पाय रोवल्याने परिसरात तणाव वाढला आहे. रुग्णाने नुकताच प्रवास केला नसल्याचे सांगण्यात आल्याने बाधिताचा संपर्क शोधण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे. परंतू मसूर आरोग्य केंद्रात तपासणीनंतर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
नडशी कॉलनी परिसरातील चौकात युवकांची मोठी वर्दळ असते. कित्येकदा पोलिसांनी हटकूनही युवकांनी नियम पाळले नाहीत. याचा मोठा फटका बसण्याची शक्यता स्थानिकांनी बोलून दाखवली. शिवाय बाधित साखळी किती असेल हा यक्षप्रश्न नडशीकरांना सतावत आहे.
ग्रामपंचायतीने सक्त ताकीद देऊनही त्याची नागरिकांनी दखल घेतलेली नाही. या भागातील पुणे, मुंबईकरांची आकडेवारीही शंभराहून अधिक आहे. त्यांच्या होम क्वारंटाईन बाबतही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
तसेच स्थानिक शाळा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने संस्था विलगीकरणाची पुरेशी सोय नसल्याचे दिसते. बाधित क्षेत्रातील सर्वेक्षण करण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविकांचे नऊ गट करण्यात आले आहेत. दररोजच्या सर्वेक्षणात परिसरातील सर्व कुटुंबांची नियमित तपासणी होणार आहे.
कार्यरत असणाऱ्यांपैकी दोन सेविका सर्वेक्षण करणार नसल्याने त्यांचे कामकाज कोणी करायचे यावरून कर्मचाऱ्यांत मतभेद दिसून आले. रुग्ण बाधित असल्याचे कळूनही तळबीड पोलिसांनी फिरकण्याचीही तसदी घेतली नाही. जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच स्थानिकांना सतर्क राहण्याबाबत आवाहन केले.
सरपंच गोविंदराव थोरात, उपसरपंच बळवंत नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर थोरात, तलाठी सुजित थोरात, ग्रामसेवक महादेव जाधव, आरोग्य पर्यवेक्षक दिपक पाटील, संदिप जाधव, आर. एम. शिरगावे, एम. एस. मुळीक यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नियोजन केले आहे. ग्रामपंचायत सदस्य सागर थोरात यांनी रोगप्रतिकारक अर्सेनिक गोळ्यांचे वाटप केले. ग्रामपंचायती मार्फत परिसरात औषध फवारणी केली आहे.