इंदापूर तालुक्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणाचे काम सुरू
निमसाखर – निरा नदीला आलेल्या पूर परिस्थितीमुळे सध्याच्या व पुढील काळातील संभाव्य धोके टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून निरानदीच्या पुराच्या पाण्याचे चित्रण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात येत आहे. यामुळे जलसंकट काळात या सर्व्हेक्षणातून सिमा रेषा निश्चीत करण्यात येणार असल्याने पुढील काळातील होणाऱ्या विकासकामांना याचा फायदा होणार आहे. इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे या कामाची सुरूवात करण्यात आली.
निरा नदीवरील बहुतांश धरणे 90 टक्यांपेक्षा अधिक भरली आहेत. निरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग साधारण एक लाख क्युसेकच्याही पुढे केला जात आहे. त्यामुळे परीस्थितीचे गांभीर्य व सावधगीरी म्हणून पाहणी करण्यात आली असून भविष्यात धरणामधून किती पाणी सोडल्यानंतर हे पाणी कोणत्या गावात कुठपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे काही धोका निर्माण होऊ शकतो का? त्या दृष्टीने कोणत्या प्रकारची खबरदारी पुढील काळात घेणे आवश्यक आहे.
नदीपासून लोक वसाहत किती अंतरावर असली पाहिजे. या बाबतच्या माहितीकरीता व त्या परीस्थितीतील नियोजनाकरीता ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने करण्यात आलेले चित्रीकरण उपयोगी ठरणार आहे. निमसाखर पासून ते पिठेवाडी पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने हे चित्रीकरण करण्यात आले आहे. किती पाणी सोडल्यानंतर नदीपासून किती अंतरावर हे पाणी जाईल, हे पाहून त्या ठिकाणी माहितीसाठी विशिष्ट खुणा करून ठेवल्या जाणार आहेत, याचा उपयोग भविष्यात पुरजन्य परीस्थिती निर्माण झाल्यास स्थानिक प्रशासना बरोबरच नागरिकांनाही होईल.
- सध्या मोठ्या प्रमाणात नदीपासुन काही अंतरावरच लोक राहात असुन, त्यामुळे अशा ठिकाणी लोक वसाहत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नदीला पूर आल्यास अशा वसाहतींना मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सुरक्षिततेची काळजी म्हणून हे चित्रीकरण करुन खुणा केल्या जाणार आहेत.
– ए.बी.जमदाडे, उपअभियंता, सार्वजनिक पाटबंधारे विभाग, निमगाव केतकी