मुंबई – नवी सुवर्ण रोखे योजना 2020-2021 मधील सातव्या शृंखलेतील सुवर्ण रोखे 12 ऑक्टोबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होणार आहेत. या सुवर्ण रोख्यातील सोन्याचा दर प्रतिग्रॅमला 5,051 रुपये निश्चित केला असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.
या सुवर्ण रोख्याची मागणी ऑनलाइन केल्यास व डिजिटल पेमेंट केल्यास अशा ग्राहकांना प्रत्येक ग्रॅमला 50 रुपयांची सवलत देण्यात येते. हे सुवर्ण रोखे केंद्र सरकारच्या वतीने रिझर्व्ह बॅंक जारी करते.
सुवर्ण रोखे एक ग्रॅमच्या टप्प्यात मिळतात.
सुवर्ण रोख्याचा कालावधी 8 वर्षाचा असून 5 वर्षानंतर यातून बाहेर पडता येते. हे सुवर्ण रोखे फक्त भारतीय नागरिक, हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, विद्यापीठे व धर्मादाय संस्थांना उपलब्ध आहेत. व्यक्तीला आणि हिंदू अविभक्त कुटुंबाला किमान एक ग्रॅमचे आणि कमाल चार किलोचे सुवर्ण रोखे खरेदी करता येतात. इतरांसाठी ही मर्यादा 20 किलोपर्यंत आहे.