रायमा सेन बंगाली चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाली आहे. हिंदीतही काही चित्रपटांत तिने काम केले. मात्र ती आपल्याच भाषेतल्या चित्रपटांत चांगली रूळली आहे. प्रस्थापितही झाली. रायमा ही अभिनेत्री मूनमून सेन यांची कन्या तर सूचित्रा सेन यांची नात.
मूनमून सेन बॉलिवुडमध्ये लक्षवेधी ठरल्या त्या त्यांच्या बोल्डनेसमुळे. मात्र सूचित्रा सेन अभिनयामुळे आणि त्यांनी दिलेल्या दमदार चित्रपटांमुळे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. बंगाली चित्रपटसृष्टीच्या तर त्या आयकॉन. त्यामुळे रायमाला त्यांच्या सावलीतून बाहेर पडत स्वत:ला सिध्द करण्याचे आव्हान होतेच.
याबाबत एका मुलाखतीत ती म्हणते की, आजीचा वारसा चालवणे ही जबाबदारी तर होतीच पण त्याहीपेक्षा तो एक मोठा दबावही होता. लोक आजही केवळ माझ्याजवळ येतात आणि हात मिळवतात ते मी त्यांची नात आहे म्हणून. सुरूवातीच्या दिवसांत या जबाबदारीचा खूप दबाव होता. मी सूचित्रा सेन यांची नात असल्यामुळे मला सगळे येतेच किंवा यायलाच हवे असे गृहीत धरलेले असायचे. त्यामुळे खूप अडचण व्हायची.
नंतर मी स्वत:ला सिध्द करत गेले. सूचित्रा सेन यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल का, या प्रश्नावर ती म्हणाली की त्या महान कलाकार होत्या. त्यामुळे त्यांच्या कलाकृतींचा रिमेक होऊ नये असे वाटते किंवा मी तरी त्यात काम करण्याचे धाडस करणार नाही.
मात्र एखाद्या चित्रपटात त्यांच्या तरूणपणाचा रोल करण्याची संधी मिळाली तर ती मला नक्कीच आवडेल. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रायमाचा एक चित्रपट दाखल होतोय. सूपरनॅचरल पॉवरवर आधारित हा विषय आहे व या प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला अनेक दमदार भूमिका मिळत असल्याची ती सांगते. रायमाला चित्रपटसृष्टीत आता 23 वर्षे झाली आहेत.