केंदूर ग्रामस्थ हैराण : नागरिक, प्रवाशांची गैरसोय
केंदूर- शिरूर तालुक्यातील चौफुला ते केंदूर रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी, ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे केंदूरचे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. केंदूर ग्रामस्थांना हा मार्ग दळणवळणाचा आहे. अनेक महिन्यापासून मुख्य रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे.
प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. कंत्राटदार मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. स्थानिक पुढाऱ्यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची तक्रार आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कंत्राटदार फिरकले नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. साईडपट्टट्या भरल्या नाहीत. रस्त्यावर खड्डयांमुळे गेल्या आठवड्यात एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला आहे. एकाचवेळी रस्त्यावर दोन वाहने आल्यावर चालकांची मोठी तारांबळ उडत आहे. पुणे मनपा बस धावते. मात्र रस्ता अरुंद असल्याने इतर वाहनांचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडी होत आहे. महेश गॅस एजन्सी कंपनीने रस्त्यालगत ठेवलेले लोखंडी पाईप देखील वाहतुकीस अडचणीचे ठरत आहे.
दरम्यान, अर्धवट कामामुळे रस्ता ओबडधोबड अवस्थेत असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. कंत्राटदाराचे आणि तालुक्यातील एका बड्या नेत्याचे हितसंबंध असल्यामुळे कंत्राटदार शेफारले आहेत. त्यामुळे कंत्राटदाराला नेतेच पाठीशी घालीत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार नागरिकांनी सुरुवातीपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. प्रशासनाने कानाडोळा करीत आहे. कंत्राटदाराशी संपर्क केला असता लवकर काम पुन्हा सुरू करू, असे सांगत या विषयावर बोलण्याचे टाळले.
- पाऊस सुरू असल्यामुळे काम करता येत नाही. येत्या दोन दिवसांत साईडपट्टया आणि खड्डे बुजवण्याचे काम सुरू करू.
चौरे, शाखा अभियंता, बांधकाम विभाग.