रविवारी अध्यक्षपदाची निवडणूक
मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्या, शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला विधानसभेत अग्निपरिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. बहुमताच्या परिक्षेला सामोरे जाण्यासाठी दोन दिवसांचे विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे सरकारला बहुमताची परिक्षा द्यावी लागणार आहे. विश्वास दर्शक ठराव जिंकण्यासाठी आघाडीने रणनीती आखली असून विरोधी पक्षाला आपले संख्याबळ दाखवून देणार आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनात रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे यांच्या सरकारला विधानसभेतील बहुमत सिध्द करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारलयानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनाची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज संध्याकाळी विधानमंडळात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला उध्दव ठाकरेंसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत दोन दिवसाच्या विशेष अधिवेशनातील कामकाज निश्चित करण्यात आले.
असा आहे कार्यक्रम
– शनिवारी विधानसभेचे कामकाज दुपारी 2 वाजता सुरू होईल. सुरूवातीला उध्दव ठाकरे हे मंत्रिमंडळातील सहकार्यांचा सभागृहाला परिचय करून देतील.
– त्यानंतर लगेच विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल.
– भाजप आणि मित्र पक्षाने विरोधी बाकांवर बसण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावावर मतदान न होता तो संमत होईल, अशी चिन्हे आहेत.
– कोणताही धोका नको म्हणून शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या आघाडीने आपापल्या आमदारांना अजूनही मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे. सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर या आमदारांची सुटका होईल.
– रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.
– या निवडणुकीत भाजपने उमेदवार दिला तर निवडणूक घेण्यात येईल.
– अध्यक्षपदासाठी गुप्त पध्दतीने मतदान होते. त्यामुळे ही निवडणूक आघाडीसाठी महत्त्वाची आहे.
– अध्यक्षांच्या निवडीपूर्वी दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचे अभिभाषण होईल.