केंद्राकडून भरीव निधी तरतूद होणार ः आढळराव पाटील यांची माहिती
नारायणगाव-जुन्नरच्या आदिवासी भागात हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु व्हावा यासाठी केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा, अवर सचिव के. चंद्रशेखर यांच्याकडे 18 कोटी 24 लाख रुपये निधीची मागणी केली असून राज्य शासनाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर केंद्राकडून भरीव निधीची तरतूद करण्याचे सूतोवाच केंद्रीय मंत्री यांनी केल्याची माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक संस्थेचे अध्यक्ष काळू शेळकंदे व मारुती वायाळ यांनी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची भेट घेऊन खानापूर (ता. जुन्नर) येथे हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु करण्याबाबत मागणी करत प्रकल्पाच्या स्थितीबाबत माहिती दिली होती. यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आढळराव पाटील यांनी दिली होती. त्यानुसार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा व केंद्रीय अव्वर सचिव के. चंद्रशेखर यांना सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करुन या उद्योगासाठी 18 कोटी 24 लाख रुपये निधीची केंद्रीय योजनेतून तरतूद करण्याची मागणी केली. त्यामध्ये 5.55 कोटी रुपये तातडीचा निधी, 5.50 कोटी रुपये अतिरिक्त आवश्यक निधी व भविष्यातील प्रकल्प उभारणीसाठी 7.30 कोटी याप्रमाणे प्रकल्प अहवालात निधीचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
आढळराव पाटील म्हणाले की, खेड, आंबेगाव, जुन्नर व मावळ तालुक्यांमध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात असून या हिरडा प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता आदिवासी बांधवांना हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या कायमस्वरुपी फायद्याचा ठरणारा आहे. हिरडा प्रक्रिया उद्योगासाठी 2 कोटी निधीची तरतूद केल्यास हा प्रकल्प सुरु होऊ शकेल. मात्र भविष्यातील या भागाची गरज लक्षात घेता हिरड्यावरील प्रक्रियेबरोबरच जांभूळ, आंबा, करवंदे आदिंवरील प्रक्रियांसाठी 50 टन क्षमतेचे शितगृह उभारणेसाठी 4.80 कोटी तसेच बाळ हिरडा गोळ्यांचा प्रकल्प उभारणेकरिता 1.5 कोटी निधीची मागणी केली आहे. या व्यतिरिक्त 532 आदिवासी हिरडा उत्पादक सभासदांना समभाग खरेदीसाठी 26.60 लाखांची मागणी केली होती. त्यास राज्य शासनाकडून संमती दर्शवत हा निधी नियमीत योजनेतून उपलब्ध करणेबाबत जिल्हाधिकारी पुणे व प्रकल्पाधिकारी घोडेगाव यांना शासन स्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत.