श्रावणी यात्रेनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई
मंचर- श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील घोडेगाव येथील अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी (दि. 8) सकाळी काढली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. टी. डाके यांनी दिली.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी यात्रेनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यासाठी मंचर-भीमाशंकर हा एकमेव मार्ग असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, यासाठी दरवर्षी भीमाशंकर यात्रा नियोजन बैठकीमध्ये अतिक्रमणाबाबत चर्चा केली जाती, परंतु प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जात नसल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती.
याची दखल घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने घोडेगाव येथील रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढून टाकली आहेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. टी. डाके, कनिष्ठ अभियंता महेश परदेशी, दिलीप ठाकुर, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, हवालदार शंकर तळपे, दिलीप वाघुले, संदीप लांडे आदी उपस्थित होते. दरम्यान, मागील वर्षीही मंचर, लांडेवाडी, शिनोली, डिंभे, तळेघर गावातील अतिक्रणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली होती.