पाच लाखांच्या कर्जासाठी भरले तब्बल बारा लाख रुपये
शिक्रापूर-वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथील व्यक्तीस कर्जाचे आमिष दाखवत बजाज इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी काढायला लावत वेळोवेळी कर्जाच्या नावाखाली ऑनलाइन पैसे भरण्यास सांगत तब्बल बारा लाख एकोणतीस हजार रुपयांना गंडा घालत फसवणूक केली असल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
याबाबत राजाराम भाऊसाहेब भंडारे (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भंडारे यांना 5 मार्च रोजी नेहा नावाच्या एका महिलेचा फोन आला व तिने मी बजाज फायनान्समधून बोलत असून तुम्हाला कर्ज पाहिजे का? असे विचारले त्यावेळी भंडारे यांनी नंतर फोन करा, असे सांगितले.
10 मार्च रोजी पुन्हा पाटील नावाच्या व्यक्तिचा फोन आला व त्याने तुम्हाला कर्जाची आवश्यकता असेल तर आमच्याकडे बजाज फायनान्सची पाच हजार रुपयांची पॉलिसी काढल्यास त्यावर तुम्हाला पाच लाख रुपयांचे कर्ज मिळेल. त्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड, लाईटबिल, बॅंक पासबुक आम्हाला पाठवा त्यावरून तुम्हाला किती कर्ज मिळू शकेल हे सांगतो, असे सांगितले. त्यानुसार भंडारे यांनी 12 मार्च रोजी सर्व कागदपत्रे पाठविले असताना त्यांना 15 मार्च रोजी रोहित शर्मा नावाने फोन आला. त्याने मी बजाज फायनान्समधून बोलत असून तुम्हाला आठ लाख रुपये कर्ज मिळू शकते, असे सांगत, मी सांगतो त्या खात्यावर तुम्ही पन्नास हजार रुपये भरा असे सांगितले. भंडारे यांनी 18 मार्च रोजी कोरेगाव भीमा येथून गाझियाबाद येथील बॅंक खात्यात पन्नास हजार रुपये भरले.
त्यावर भंडारे यांना फोन करून शर्मा याने सरकारच्या नवीन योजनेनुसार तुम्हाला कर्जाच्या रकमेसोबत चार लाख रुपये मिळणार असून त्याची परतफेड करावी लागणार नसल्याचे सांगत पुन्हा एका खात्यावर एक लाख रुपये भरण्यास सांगितले. भंडारे यांनी पुन्हा एक लाख रुपये भरले. यानंतरही रोहित शर्मा याने भंडारे यांना वेळोवेळी फोन करून गाझियाबाद, वेस्ट बंगाल, लखनऊ, उत्तरप्रदेश या ठिकाणच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यात तब्बल बारा लाख एकोणतीस हजार रुपये भरून घेतले. ही रक्कम भंडारे यांनी 24 जून 2019 पर्यंत कोरेगाव भीमा येथील एक बॅंकेतून तसेच नातेवाइकांच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने भरली आहे.
यानंतर देखील रोहित शर्मा व सावंत नावाच्या व्यक्तिंनी भंडारे यांना फोन करून डिमांड खाते उघडण्यासाठी दहा लाख रुपये भरण्याची मागणी करीत पैसे भरले नाही तर तुमच्या कर्जाची फाईल रद्द होईल व तुमचे भरलेले पैसे मिळणार नाहीत, असे सांगितले. त्यावेळी भंडारे यांची फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस नाईक विलास आंबेकर हे करीत आहेत.