डॉ. वैदेही नगरकर : मुळशीतील वसतिगृहात सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन प्रदान
पिरंगुट- ग्रामीण भागात मासिक पाळीसंबधी अजूनही बरेच गैरसमज आहेत.त्यातून महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्याकरिता जागृतीची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे मत डॉ. वैदेही नगरकर यांनी व्यक्त केले.
शिळेश्वर, माले व ताम्हिणी येथील वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या जेवणाची उत्तम सोय व्हावी तसेच निवासी राहणाऱ्या मुलींमध्ये मासिक पाळीसंबधी असलेले समज-गैरसमज दूर व्हावेत, त्यांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्याची सवय लागावी व याबाबत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांमध्ये जाणीव जागृती व्हावी याकरिता खराडी (पुणे) येथील ऑलस्क्रिप्ट कंपनीच्या सी. एस. आर. विभागातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून मदत उभी केली व ती संबंधित शाळा व वसतिगृहाकडे सुपूर्द केली.
कंपनीने माले, शिलेश्वर येथील वसतिगृहात मुलींकरिता पुढील सहा महिन्याकरिता आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन व वापरलेल्या नॅपकीनच्या विल्हेवाट लावण्यासाठीची यंत्रणा बसवून दिली आहे. दरम्यान, ऑलस्क्रिप्टच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन वापर व त्याची विल्हेवाट या प्रशिक्षण व वसतिगृहाकरिता आवश्यक किराणा साहित्य भेट प्रदान कार्यक्रमात आसदे येथील स्वामी विवेकानंद विद्यालय डॉ. नगरकर बोलत होत्या. याप्रसंगी मुख्याध्यापक सतीश शिंदे, कंपनीचे ऑल इंडिया हेड रमेश वर्धराजन, सी. एस. आर. विभागाच्या प्रमुख पूनम जैन, डॉ. गणेश कोथेकर, विक्रांत वाल्हेकर, निखिल सुपेकर, स्मिता डोळे, नोशी तिवारी, निलिमा पांडे, आभा शर्मा, श्रीनिवास मुरलीधरन, आदी मान्यवर उपस्थित होते.