शिरूर-हवेलीत सत्ताधारी सेना-भाजपकडे कार्यकर्त्यांची ओढ
लोणी काळभोर -देशात व राज्यात ज्या प्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधी असलेल्या वेगवेगळ्या पक्षांतील विविध पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, त्याचे लोण शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात ही आगामी काळात येण्याची दाट शक्यता आहे. सध्या असलेली शांतता ही वादळापूर्वीची आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरु झालेले हे आऊटगोईंग कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला थांबवायला अद्यापही यश मिळालेले नाही. जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. तसे सत्ताधारी भाजप व शिवसेनेमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे, यात शंका नाही. आगामी दोन-तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात अपयश आले तरीही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप-शिवसेना युतीला राज्यात लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले. त्यामुळे तयारीच्या बाबतीत हे दोन्ही सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या तुलनेत आघाडीवर आहेत.
- डॅमेज कंट्रोल करण्याचे आटोकाट प्रयत्न
220 जागी युतीचे आमदार निवडून येतील असा आत्मविश्वास दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार पुन्हा सत्तारूढ झाले आहे. राज्यातही आमचे सरकार पुनश्च सत्तेवर येणार आहे, अशी भूमिका भाजप-सेनेचे नेते व कार्यकर्ते मांडत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील मोठे-मोठे नेते भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. हाच विचार करून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील जिल्हा व तालुका पातळीवरील छोटे मोठे कार्यकर्ते भाजप व शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. हा विचार कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्याचे आटोकाट प्रयत्न जिल्हा पातळीवरील पदाधिकारी करीत आहेत; मात्र या कार्यकर्त्यांनी मनाशी पक्की खूणगाठ बांधली असल्यामुळे हे कार्यकर्ते आता माघारी फिरणार नाहीत, हे जवळपास नक्की आहे. - ऐनवेळी उमेदवारी ठरणार
या पक्ष बदलांच्या पार्श्वभूमीवर शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत रंगत येणार आहे. भाजप-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे बाबुराव पाचर्णे हे येथून विजयी झाले आहेत. त्यांनी माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांचा पराभव केला होता. या वेळीही भाजपकडून लढण्यासाठी विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे प्रमुख दावेदार आहेत. या दोघांपैकी उमेदवारी कुणाला मिळणार ही उत्सुकता सर्वांनाच आहे. कोण कुठल्या पक्षांकडून निवडणूक लढवणार हे आता तरी निश्चित नाही. जो पर्यंत तिकीट वाटप निश्चित होत नाही, तो पर्यंत कोण कुठल्या पक्षाकडून लढणार आहे, हे मतदारांनाच नव्हे खुद्द नेत्यांनाही माहित नाही.