पिंपरी – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे या अभिनेत्रीवर आता देहूरोड पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर केल्याने जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष हभप नितीन गोपाळ मोरे (वय 57, रा. देहूगाव) यांनी रविवारी (दि. 15) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हिने ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर करून वादग्रस्त व विटंबनात्मक लेखन केले. ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. संत तुकाराम महाराजांना जगदगुरू म्हटले जाते. केतकी चितळे हिने संत तुकाराम महाराजांच्या नावाचा वापर करून वादग्रस्त व विटंबनात्मक पोस्ट केली असल्याने वारक-यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
ट्वीट पडणार महागात
देहूरोड पोलीस ठाण्यात शरद पवारांविषयी आक्षेर्पाह पोस्ट करणाऱ्या एका ट्विटर अकाउंटधारकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष सुभाष बंसल (वय 41, रा. देहूरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ऽछळज्ञहळश्रइहरीाश8 या नावाने अकाउंट असलेल्या व्यक्ती विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील भामरे या व्यक्तीने त्याच्या ऽछळज्ञहळश्रइहरीाश8 या ट्विटर अकाउंटवर ‘वेळ आली आहे बारामतीच्या गांधींसाठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची’ अशी शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक,मानहानीकारक व जीवे मारण्याच्या धमकीचा मजकूर असलेली पोस्ट केली.