निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन
मुंबई : वर्तमान बॅंकांची कर्जे आणि वाढती अनुत्पादित मालमत्ता अर्थात “एनपीए’ चा बॅंकावरील बोजा कमी करण्यासाठी शेअर बाजारातील कर्ज बाजाराची (डेब्ट मार्केट) व्याप्ती वाढविणे तसेच सर्व प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांचा विकास होणे गरजेचे असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.
त्या आज मुंबई येथे स्टॉक एक्सचेंजच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त “भांडवली बाजारपेठचे लोकशाहीकरण’ या विषयावर बोलत होत्या. नॅशनल स्टॉक एक्सचेंज दरवर्षी 3 नोव्हेंबरला “किरकोळ गुंतवणूकदार दिवस’ साजरा करतो. आज हे दोन्ही कार्यक्रम एकत्रित घेण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या की, मागील 25 वर्षात मुंबई शेअर बाजाराने वित्तीय साक्षरता वाढवण्यासाठी विविध प्रकारचे अथक प्रयत्न केले असून सकारात्मक दृष्टीने त्यांनी अवलंबिलेले आधुनिक तंत्रज्ञान हे विशेष महत्वाचे आहे.
शेअर बाजाराने लोकशाहीवादी, किरकोळ गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांपर्यंत गुंतवणूकीचे महत्व विषद केले. त्या म्हणाल्या की, वित्तीय जागरुकता आणण्यासाठी देशभरातील 600 जिल्ह्यांमधून विविध प्रकारची शिबीरे, परिषदांचे आयोजन शेअर बाजाराने केले असून त्यातून नेतृत्वधारी गुंतवणूकदार पुढे आल्याने किरकोळ गुंतवणुकदारांच्या संख्येत वाढ झाली. जोखीम व्यवस्थापन, गुंतवणूकदारांचे संरक्षण, गॅरेन्टी सेटलमेंट या सर्व बाबी आधुनिक तंत्रज्ञान , कायद्याचा पाठिंबा तसेच वित्तीय अधिनियमन सेबीमुळे शक्य झाले.
शेअर बाजाराच्या 25 वर्षाच्या कामगिरीविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, विदेशातील शेअर बाजार सुद्धा आपल्या स्टॉक मार्केटचा निरिक्षण आणि आढावा घेत असतात. या 25 वर्षात देशाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणुकदारांना आकर्षित करुन हा बाजार कसा विस्तारला याचे कौतुकास्पद उदाहरण जेव्हा विदेशी नेत्याकडून ऐकायला मिळते तेव्हा आपल्या देशाचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही असेही त्यांनी विशेषत्वाने सांगितले.
दोन वर्षात शेअर बाजारात 9 लाख कोटींची उलाढाल
मागील दोन वर्षात भारतीय शेअर बाजाराने 9 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली असून यामध्ये 30 टक्के वाटा इक्वीटी आणि 70 ते 75 टक्के वाटा डेप्ट मार्केटचा आहे, असे सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सर्व आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त असे भारतीय शेअर बाजार असून, किरकोळ गुंतवणुकदारांपासून ते विविध फंड मॅनेजस्र्पर्यंत त्यांचे सर्व व्यवहार ऑनलाईन केले जातात. त्यांनी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पद्धतीविषयी माहिती दिली तसेच रोबोट डव्हायजरी सर्व्हिसेस, कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्निंग या पद्धती विकसित करण्यात येत असल्याचे सांगितले.