रेडा – हरित इंदापूरसाठी तसेच पर्यावरण समतोलासाठी इंदापूर शहरातील नागरिकांचा कचऱ्यापासून खत निर्मितीचा उपक्रम विधायक आहे. घरच्या घरी खत निर्मिती तसेच वृक्षारोपणासाठी, जलपुर्नभरण व पुनर्वापर या करीता इंदापूर नगरपरिषदेने प्रोत्साहनात्मक कर सवलत दिली आहे. शहरातील अनेक नागरिकांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प असल्याचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सांगितले.
इंदापूर शहरातील दत्तनगर येथील गृहिणी कल्पना बापूसाहेब रेडेकर यांनी घरातील ओला कचरा नगरपरिषदेच्या घंटा गाडीत न देता त्या कचऱ्यापासून घरच्या घरी सेंद्रिय खत निर्मिती करून आपली परसबाग फुलवली आहे. या उपक्रमास इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शहा, मुख्याधिकारी रामनिवास झंवर तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी भेट दिली. यावेळी रेडेकर परिवाराचा पैठणीसाडी व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. त्यावेळी नगराध्यक्षा बोलत होत्या.
रामनिवास झंवर म्हणाले की, ओला व सुका कचरा वेगवेगळा करून ओल्या कचऱ्यापासून शास्त्रशुद्ध पद्धतीने घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करून कचरा विघटनाच्या समस्यांचे निराकरण करण्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरत आहे. नगरपरिषदेच्या वतीने सहभागी नागरिकांना हरितघर प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी जावेद शेख, रमेश धोत्रे, सागर गानबोटे, पाणी पुरवठा निरीक्षक सहदेव व्यवहारे, रनिरीक्षक लिलाचंद पोळ,अशोक चिंचकर, चंद्रशेखर मोदळे उपस्थित होते.
5 ते 10 टक्के सवलत…
आपल्या घरातील ओला कचरा नगरपरिषदेच्या घंटा गाडीत न देता ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी खत निर्मिती केल्यास संकलित करामध्ये 5 टक्के सूट, घराच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून त्याच्या वाढीसाठी निगा राखल्यास आणि जलपुर्नभरण व पुनर्वापर केल्यास संकलित करावर 5 टक्के सवलत मिळणार आहे तसेच वरील पैकी तिन्ही उपक्रम राबविल्यास एकूण संकलित करामध्ये 10 टक्के सवलत मिळणार आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी केले आहे.