इस्लामपूर/सांगली : सौदी अरेबियातून आलेल्या चार जणांमुळे एकाच कुटुंबातील 23 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली असतानाच या बाधितांच्या संपर्कात इस्लामपुरातील 337 जण आल्याचे शासकीय सर्वेक्षणात समोर आले आहे. दरम्यान या सर्वांना घरातच विलगीकरणात राहण्याचे आदेश दिले आहेत.
इस्लामपुरातील या भयावह स्थितीची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसह तीन जणांचे पथक सांगलीला पाठवण्यात आले आहे. या पथकाने मिरज शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय केवळ कोरोना बाधीतांसाठी राखीव करण्याचे आदेश दिले. तर सांगलीतील रुग्णालय अन्य रुग्णांसाठी खुले ठेवण्याचे नियोजन केले आहे. हे रुग्णालयाही मिरज वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित आहे.
इस्लामपुरातील चार जण सौदी अरेबियाला जाऊन आले. त्यांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्यात अन्य 19 जणांना त्याची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली. या घटनेनंतर इस्लापुरात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. प्रत्येक घरातून एका व्यक्तीलाच बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे.
शहरात सर्वत्र निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेत. घरात विलगीकरणात राहण्यास सांगितलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे अद्याप सापडली नाहीत, मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे निर्बंध घालण्यात आल्याचे तहसीलदारांनी सांगितले.