अलिगड – माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अब्दुर रहमान यांच्या अलिगड मुस्लिम विद्यापीठातील सीएए कायद्याच्या विरोधातील भाषणाला उत्तरप्रदेश पोलिसांनी मनाई केली आहे. ते हे भाषण देण्यासाठी आज दिल्लीहून येथे आले पण पोलिसांनी त्यांना विमानतळावरच अडवून त्यांना तेथून दिल्लीला परतण्यास सांगितले.
रहमान यांनी सीएए कायद्याला विरोध करीत गेल्या डिसेंबर महिन्यात आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्यांना पोलिसांनी लोधा पोलिस स्थानकातही काही काळ स्थानबद्ध करून ठेवले होते. ते महाराष्ट्रातील माजी आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितले की पोलिसांनी मला अलिगड मुस्लिम विद्यापीठात उपस्थित राहण्यास मज्जाव केला व त्याचा लेखी आदेश त्यांनी माझ्यावर बजावला आहे. आपल्या उपस्थितीतीने कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या उत्पन्न होऊ शकते असे कारण त्यांनी त्यासाठी दिले आहे असे ते म्हणाले.
आपल्याला बाजवण्यात आलेल्या आदेशाचा मान राखून मी परत जाण्याचा निर्णय घेतला असून आपण पुन्हा रितसर अनुमती घेऊन इथे पुन्हा येऊ असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. अलिगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी समन्वय समितीने त्यांना येथे व्याख्यानासाठी निमंत्रीत केले होते. सीएए हा कायदा देशातील बहुधार्मिकत्वाच्या विरोधात आहे अशी रहमान यांची भूमिका असून याच भूमिकेतून त्यांनी या कायद्याला विरोध करीत आपल्या पोलिस सेवेचा डिसेंबर महिन्यात राजीनामा दिला आहे.