-कॉंग्रेसचा मनपा प्रशासनाला खणखणीत इशारा
-आधी गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी
नगर – प्रोफेसर कॉलनी चौका महापालिकेची जागा असून त्यावर मनपाने गाळे उभारलेले आहेत. नुकत्याच लागलेला कोर्टाच्या निकालानंतर मात्र गाळे जमीनदोस्त करण्याची घाई सुरू केली आहे. कॉंग्रेसने याला तीव्र विरोध केला आहे. आधी निधीची तरतूद करा, टेंडर काढा, चांगला ठेकेदार नेमा, वर्क ऑर्डर द्या, मगच बुलडोझर लावा. अन्यथा कॉंग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.
गाळे पाडण्याची मनपा प्रशासनाची घाई ही या गाळ्यांमधून मिळणाऱ्या व्यावसायिक लाभासाठी आणि पडद्याआडून यामध्ये आर्थिक हितसंबंध बाळगणाऱ्या राजकीय मंडळींच्या संगनमतातून सुरू आहे. प्रोफेसर चौकातील नाट्य संकुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून आजही रखडलेले आहे. मनपाला आणि मनपाचे नेतृत्व करणाऱ्यांना इतक्या वर्षांपासून साधी ही कामे पूर्ण करता आलेली नाहीत. आताच्या सर्व गाळेधारकांना ग्राउंड फ्लोअरला गाळे देत त्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करावे.
या जागेमध्ये स्टॉल्सद्वारे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा. या चौकात आणि परिसरात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी, फळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र भाजी फळ मार्केट विभाग निर्माण करावा. उर्वरित व्यावसायिक गाळे विकताना ते आजच्या बाजारभावाप्रमाणे भाडेतत्त्वावर देत त्यातून मनपासाठी मोठे उत्पन्न मिळेल असे नियोजन करावे.
सदर गाळे व्यावसायिकांना देण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशा काही मागण्या कॉंग्रेसच्या आहेत, असे काळे यांनी सांगितले. या संदर्भात शहर कॉंग्रेसचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे कॉंग्रेसचे सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड यांनी म्हटले आहे.
=================