सातारा : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला जागाच नाही

साताऱ्यात भुयारी गटार योजनेसाठी रस्त्यांचे खोदकाम

सातारा – शहरातील बहुचर्चित भुयारी गटार योजनेचे काम प्रगतिपथावर असताना, या योजनेतील महत्त्वाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राला अद्याप जागा उपलब्ध झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या योजनेचे खोदकाम शहरातील रस्त्यांच्या मुळावर उठले असून वर्दळीच्या रस्त्यांची नाकाबंदी झाली आहे.
पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या अजेंड्यावरील भुयारी गटार योजना महत्त्वाकांक्षी आहे.

105 कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे काम सुरू होऊन तीन वर्षे उलटली, तरी या योजनेचे अवघे 40 टक्केच काम झाल्याची माहिती बांधकाम विभागातून देण्यात आली. कोणत्याही योजनेच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला कार्यादेशानंतर सुरवात करण्यात येते. मंजुरी प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने जमिनीचे हस्तांतरण ही महत्त्वाची प्रक्रिया असते.

मात्र, या योजनेचे काम एकीकडे प्रगतिपथावर असताना, दुसरीकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी पालिकेला अद्याप जागाच उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले जाते. प्रकल्प मंजुरीच्या दरम्यान जरंडेश्वर नाका परिसरात ही जागा उपलब्ध करून घेण्यात येईल, अशी हमी सत्ताधाऱ्यांनी दिली होती. मात्र, जागाच उपलब्ध न झाल्याने या प्रकल्पाचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे.

रस्ते विकास अनुदानातून शहरातील 11 मार्गांचे काम पूर्ण झाले असताना, शहरात ऐन उन्हाळ्यात रस्त्यांचे खोदकाम पुन्हा सुरू झाले आहे. चिमणपुरा, रामाचा गोट, कोटेश्वर मंदिर ते राधिका चौक, बाबर कॉलनी मार्ग, रविवार पेठेतील अजिंक्‍य कॉलनी परिसरात अंतर्गत वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम झाले आहे. रस्त्यांचे डांबर उखडले गेल्याने या रस्त्यांवरचा प्रवास सुरक्षित राहिलेला नाही. ठेकेदाराने रस्ते दुरुस्तीची हमी दिली असली, तरी कामाचा वेग लक्षात घेता पावसाळ्यापर्यंत रस्ते पुन्हा दुरुस्त होतील, याची कोणतीही शाश्‍वती नाही.

 उदयनराजेंचा पाठपुरावा ठरणार महत्त्वाचा : 

खा. उदयनराजे भोसले यांचा कामाचा झपाटा आणि शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे त्यांचे कौशल्य अफलातून आहे. भुयारी गटार योजनेसाठी अद्याप जागा उपलब्ध झालेली नाही, ही बाब त्यांच्याही चांगलीच लक्षात आहे. या प्रकरणात उदयनराजेंनीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जागा हस्तांतरणाची समस्या निकाली काढणे महत्त्वाचे ठरणार आहे. जागा विकसन अथवा खरेदी प्रक्रियेसाठी सातारा पालिकेने अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जागा पालिकेला ताब्यात मिळावी, याकरिता उदयनराजे यांनाच जातीने लक्ष घालावे लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.