पिंपरी-चिंचवडमध्ये बाधितांचा उच्चांक! दिवसात 3,395 जणांना संसर्ग

पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, रोजच धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत पुन्हा उच्चांकी 3395 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1 लाख 50 हजार 928 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 3382 जणांना करोनाची लागण झाली असून, शहराबाहेरील 13 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमधील 16 जण शहरातील रहिवासी होते. तर शहराबाहेरील दोघांचा उपचार सुरू असताना गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 2065 वर पोहोचला असून, शहराबाहेरील 2 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 846 ची संख्या आज गाठली.

आतापर्यंत शहरातील 1 लाख 26 हजार 635 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 8961 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 4528 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयामध्ये 38 जण करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि. 4) 38 जण करोनाबाधित रुग्ण आढळले. रुग्णालयामध्ये 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुक्त झालेल्या 9 रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले. करोनामुळे मृत्यू झालेली महिला ही निमगाव म्हाळुंगे-खेड येथील रहिवाशी आहे. रुग्णालयात सध्या 73 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 36 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.