जिल्हा बॅंकेस 150 कोटींचा विक्रमी करपूर्व नफा- शिवेंद्रसिंहराजे भोसले

करोनाच्या संकटातही गत आर्थिक वर्षात दमदार कामगिरी

सातारा – करोना संकटामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात बॅंकिंग, उद्योग व व्यवसाय या सर्व क्षेत्रांसमोर अनंत अडचणी निर्माण झाल्या. या अडचणींवर मात करत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने 150 कोटी रुपयांचा विक्रमी करपूर्व नफा मिळवला आहे, अशी माहिती चेअरमन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. सर्वांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासात बॅंक अग्रेसर आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेकडून दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील “सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार’ सातारा जिल्हा बॅंकेला सहा वेळा मिळाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, दि. 31 मार्चअखेर बॅंकेचा संमिश्र व्यवसाय 13 हजार 845 कोटी रुपयांचा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 978 कोटींची वाढ झालेली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षाअखेर बॅंकेच्या ठेवी आठ हजार 430 कोटी पाच लाख रुपये (गतवर्षीच्या तुलनेत 807 कोटी 77 लाखांची वाढ), पाच हजार 415 कोटी 25 लाखांचे कर्जवाटप (गतवर्षीच्या तुलनेत 170 कोटींची वाढ), गुंतवणूक तीन हजार 975 कोटी 70 लाख (गतवर्षीच्या तुलनेत 804 कोटींची वाढ), स्वनिधी 658 कोटी 20 लाख (गतवर्षीच्या तुलनेत 53 कोटी 84 लाखांची वाढ) आहे.

ढोबळ करपूर्व नफा 150 कोटी रुपये (गतवर्षीच्या तुलनेत 16 कोटी 55 लाखांची वाढ) झाला आहे. सलग 14 व्या वर्षी नक्त अनुत्पादक कर्जाचे (एपीए) प्रमाण “शून्य’ टक्‍के राखले आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात बॅंकेने सभासद संस्थांना 12 टक्के लाभांशाची तरतूद केली होती; परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर, बॅंकांनी 31 मार्च 2020 च्या नफ्यातून लाभांश वितरीत करू नये, असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने दिले होते. त्यामुळे सभासद संस्थाना लाभांश देता आला नाही.

तथापि, विकास संस्थाच्या मध्यम व दीर्घ मुदत कर्जाच्या येणे बाकीवर रिबेट व प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा आणि करोनामध्ये कर्जदार सभासदांना मेडिक्‍लेम, पीक कर्जावरील व्याज परतावा आदी लाभ देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे.

करोना संकटकाळात बॅंकेने स्थलांतरित मजूर, निराधार व्यक्तींना एक कोटी रुपयांचे जीवनावश्‍यक साहित्य वितरीत केले. करोनावरील उपाययोजनांसाठी स्वनिधीतून एक कोटी आणि संचालकांचा एक दिवसाचा सभा भत्ता व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मिळून एक कोटी 16 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले. बॅंक ग्राहकांना आधुनिक बॅंकिंग सेवा देत आहे.

बॅंकेच्या 320 शाखा, 55 एटीएम व मोबाइल एटीएम आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना लाभदायी योजनांमार्फत मदत करण्याचे संचालक मंडळाने निश्‍चित केले आहे. बॅंकेच्या यशात ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, संचालकांचे मार्गदर्शन, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.