शेतकरी संपन्न झाला तरच अर्थव्यवस्था मजबूत होईल

वाघापूर येथील ग्राहक मेळाव्यात तहसीलदार अतुल म्हेत्रे यांचे प्रतिपादन

वाघापूर- सततच्या दुष्काळाने शेतकरी पिचला आहे. त्यातून त्याला सावरण्यासाठी थेट मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यातून सावरण्यासाठी पिकविमा आणि इतर योजनांचा लाभ घेतला पाहिजे. शेतकरी संपन्न झाला तरच देश संपन्न होईल आणि भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल. आधुनिक काळाप्रमाणे आता बदलले पाहिजे. शेतकऱ्यांनी आता ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केले पाहिजेत आणि विविध कृषी आणि कृषिपूरक योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी केले आहे.

वाघापूर (ता. पुरंदर) येथे स्टेट बॅंक ऑफ इंडिया सासवड शाखेच्या वतीने ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी स्टेट बॅंक ऑफ इंडिया क्षेत्रीय विभागाच्या प्रमुख कल्पना हरिहरण, सासवड शाखेचे मुख्य व्यवस्थापक अजित घोलप, उपव्यवस्थापक अमृता पाटील, कृषी विभागाच्या आत्माचे गणेश जाधव, उपव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, बॅंकेच्या कृषी अधिकारी सीमा जाधव, वाघापूर शाखाप्रमुख सिद्धी ठवाळ, कृषी मंडल अधिकारी बनसोडे, वनपुरी गावचे सरपंच नामदेव कुंभारकर, गुरोळीचे सरपंच बापूसाहेब शिंगाडे, सिंगापूरचे सरपंच रामदास उरसळ, वाघापुरचे सरपंच मनोज कुंजीर, शेतकरी प्रतिनिधी अमोल जगताप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महादेव खेंगरे पाटील त्याचप्रमाणे बॅंकेचे ग्राहक आणि शेतकरी आदी उपस्थित होते.

केंद्र आणि महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्‌या सक्षम बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पतपुरवठा केला जात आहे, परंतु अधिकारी वर्ग जर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर न जाता केवळ कागदोपत्री कामकाज करीत रहिला तर ज्यांच्यासाठी योजना बनविल्या तेच उपेक्षित राहतील. त्यामुळे आपण जनतेची सेवा करण्यासाठी शासन आपल्याला पगार देते ही भावना ठेऊन काम केल्यास नक्कीच यश येईल, अन्यथा सर्व योजना कागदावरच राहतील, अशी खंत पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी व्यक्त केली आहे.

कृषी मंडल अधिकारी बनसोडे यांनी कृषी विषयक योजनांची माहिती दिली. ट्रॅक्‍टर अनुदान, कांदा चाळ अनुदान, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, पॉलीहाउस यासारख्या कृषी योजनांचे अनुदान घेण्याचे आवाहन केले. करंगुटकर यांनी बॅंकेच्या वसुली, नवीन कर्ज प्रकरणे याबाबत माहिती दिली. प्रास्ताविकात बॅंकेचे व्यवस्थापक अजित घोलप यांनी शासनाच्या नवनवीन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यानी वेळेत कर्जफेड केल्यास ग्राहकांना नवीन प्रकरणे करताना त्रास होणार नाही आणि वेळेत कर्ज मिळेल यासाठी बॅंकेशी वेळोवेळी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वृक्ष देऊ न सन्मानित करण्यात आले. सीमा जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर भारती पाटील यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.