शिरूर तालुक्‍याचा पारा 43 अंशावर

जनता उष्णतेने हैराण : सकाळी दहानंतर रस्त्यांवर शुकशुकाट

संविदणे- एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर वातावरणात दररोज बदल घडत आहेत. कधी ढगाळ तर कधी तीव्र ऊन असा वातावरणाचा अनुभव येत आहे. शनिवारी (दि. 27) उन्हाचा पारा 40 अंश टप्पा पार करुन तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

सकाळी दहानंतर नागरिक घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करीत आहेत; परंतु सध्या लग्न समारंभ, निवडणूक यामुळे नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका लहान मुले व वृद्धांना बसत असून त्यांची प्रकृती बिघडत असल्याने दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. रात्रीच्या वेळीसुद्धा तापमानही वातावरणातील उष्णाता कमी होत नसल्याने नागरिक घराबाहेरील अंगणात झोपत आहेत. मात्र, सविंदणे, कवठे येमाई, चांडोह, टाकळी हाजी, पिंपरखेड या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने हल्ला करण्याची भीती असल्याने रात्री अंगणात कोणी झोपू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच महत्त्वाचे काम नसेल तर नागरिकांनी घरा बाहेर पडू नये तसेच थंडगार फळांबरोबर, ताक, माठातील थंड पाणी घ्यावे, असे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे.

  • ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने रात्रीच्या वेळी बिबट्या पाण्याच्या व अन्नाच्या शोधात मानवीवस्तीकडे धाव घेत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांनी बाहेर झोपायाचे टाळावे.
    – तुषार ढमढेरे, वनपरीक्षेत्र आधिकारी, शिरूर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.