मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. कॉंग्रेस महाआघाडी आणि शिवसेना-भाजप युतीने एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे वातावरण ढवळून निघालेले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचारात उडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक आणि अटीतटीची बनली आहे. प्रचार संपल्याने आता सर्वाचे लक्ष प्रत्यक्ष मतदानाकडे लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 17 मतदारसंघांमध्ये 323 उमेदवार रिंगणात उतरले असले तरी या मतदारसंघातील 17 उमेदवारांचे राजकीय भवितव्य 3 कोटी 11 लाख 92 हजार मतदार घडविणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठ पणाला लागली असून मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये 31 मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. आता शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरु झाली असून चौथ्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी,कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य,मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 मतदारसंघामध्ये 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रीयेत सुमारे 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. या 17 लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत. 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.