-->

विदेशरंग : विविध देशांना जोडणारा “ट्रेड रूट’

-आरिफ शेख

नवीन वर्षात पाकिस्तान, इराण, तुर्कस्तान दरम्यान रेल्वेसेवा प्रारंभ होत आहे. तुर्कीहून युरोपपर्यंत हा मार्ग विस्तारला जाईल. दोन खंडांना जोडणाऱ्या या लोहमार्गाविषयी…

तीन देशांना रेल्वेने जोडणारा प्रकल्प नुकताच पूर्ण झाला आहे. नवीन वर्षात पाकिस्तान, इराण व तुर्कस्तान हे तीन देश सहा हजार पाचशे किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाने जोडले जातील. तुर्कस्तान हा आशिया व युरोपच्या दरम्यान असल्याने तेथून युरोपपर्यंत रेल्वेने सहज सुलभ पोचणे शक्‍य होणार आहे. सुरुवातीला व्यापारी उद्दिष्ट ठेवून हा मार्ग अंमलात आला. पुढे प्रवासी व पर्यटनमार्ग म्हणून विस्तारायला त्यात संधी आहे. इस्लामाबादहून हा मार्ग आरंभ होईल. तप्तान बॉर्डरपर्यंत तो असेल. तेथून इराणच्या जाहेदान प्रांतापर्यंत हा मार्ग जोडला गेला आहे. पुढे इराणची राजधानी तेहरान अन्‌ तेथून पूढे तुर्कीचे तत्वान, व्हॅनसिटी,अंकारा अन्‌ तुर्कीची आर्थिक राजधानी इस्तंबूलपर्यंत जोडला गेला आहे. इस्तंबूल या शहराचा निम्मा भाग युरोप खंडात येतो. तेथून पुढे बुखारेस्ट, बुडापेस्ट, व्हिएन्ना, म्युनिच, पॅरिस, लंडनपर्यंत लोहमार्गाने प्रवास करणे शक्‍य आहे. बुडापेस्टहून बेलग्रेड व सोफिया ही शहरे बायपासने या मार्गाला जोडली गेली आहेत.

वरील मार्गावर पूर्वीचेच अनेक लोहमार्ग अस्तित्वात होते. त्यांना आपसात जोडणारे नवेमार्ग उभारले गेले. पाक, इराण, तुर्की यांना या मार्गाचा मोठा व्यापारी लाभ अपेक्षित आहे. आज रोजी जर पाकला तुर्कस्तानला माल पाठवायचा असेल तर, कराची बंदराहून अरबी समुद्रामार्गे गल्फ ऑफ एडन नंतर लाल समुद्र, तेथून सुवेझ कॅनाल ओलांडत तुर्कस्तानला जावे लागे. या प्रवासास 45 दिवस लागत. नव्या रूटनुसार रेल्वे मार्गाने अवघ्या बारा दिवसांत हा प्रवास पूर्ण होईल. पाककडे निर्यात करायला तसा फारसा वाव नाही. नव्या मार्गाचा वापर सी-पेकद्वारा चीन अधिक करू शकतो. जगातील मोठा निर्यातदार असलेल्या चीनचे पाकिस्तानसह इराण व तुर्कीशी मधुर संबंध आहेत. खुश्‍कीच्या मार्गाने तो आपली निर्यात मध्य आशिया व युरोपपर्यंत वरील रूटनुसार सहज नेऊ शकतो. पारंपरिक मार्गाने चीनला यासाठी बारा हजार किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. नव्या रूटनुसार त्याने ग्वादर पोर्टचा वापर केला तर, हे अंतर केवळ दोन हजार किलोमीटरमध्ये तो पूर्ण करू शकतो.

पाक, इराण व तुर्की हे तीन देश मागील काही वर्षांपासून अधिक जवळीक साधत आहेत. भौगोलिक सलगतेचा फायदा त्यांना व्यापार व पर्यटन विस्ताराला होऊ शकतो. मात्र पाकिस्तान हा व्यापारवृद्धीसाठी या मार्गाचा म्हणावा तसा आजवर वापर करू शकलेला नाही. तुर्कीशी पाकचा वार्षिक व्यापार सहाशे ते आठशे मिलियन डॉलर इतका आहे.त्यापेक्षा दहापट अधिक व्यापार भारत-बांग्लादेश दरम्यान आहे. पाककडे निर्यात करण्यासारखे आहे तरी काय? त्याचे भौगोलिक महत्त्व असाधारण असूनही व्यापारीदृष्ट्या त्याची मोठी पीछेहाट आहे. भारताशी त्याचा व्यापार जेमतेम आहे. अफगाणिस्तान अशांत असल्याने तेथेही व्यापार विस्तार मर्यादित आहे. इराणवर आंतरराष्ट्रीय आर्थिक बंधने असल्याने पाकला त्याचाही लाभ उठविता येत नाही. पाक-चीन दरम्यान मोठा व्यापार आहे. मात्र तो एकतर्फीच म्हणावा लागेल. चीन पाकला प्रचंड प्रमाणात निर्यात करतो, तुलनेने आयात नगण्य आहे. चीनने पाकच्या माध्यमातून खूप मोठे व्यापारी लाभ उचलले आहेत. भारत-पाक दरम्यान जर संबंध सुरळीत असते, तर याचा लाभ घेणे भारताला देखील शक्‍य झाले असते. चाबहार सारखा लांबलचक वळसा न मारता भारताला पाकमधून मध्य आशिया व युरोपची बाजारपेठ काबीज करता आली असती, असो.

वरील लोहमार्गाने अनेक देश खडबडून जागे झाले आहेत. उझबेकिस्तान याबाबत पुढे आहे. त्याने पाकबरोबर कराराची तयारी दर्शविली आहे. पाक-अफगाण बॉर्डरपर्यंत आधीच रेल्वे करार झाला आहे. तुरखम बॉर्डरपर्यंतचा प्रकल्प पूर्ण झाला की उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अन्‌ पाकिस्तान हे तीन देश लोहमार्गाने जोडले जातील. मध्य आशियात जाण्यासाठी पाकला उझबेकिस्तान हा कळीचा देश ठरणार आहे. शिवाय उझबेकिस्तानात अठराशे नैसर्गिक खनिज साठे आहेत. त्यात युरेनियम, कॉपर, सोने, कोळसा, झिंक, पेट्रोल आदींचे साठे आहेत. अफगाणिस्तानात चौदाशे ठिकाणी अशी खनिज आहेत. त्यात क्रोमाइट, कोळसा, कॉपर, सोने, लोखंड, शिसे, नैसर्गिक वायू, मौल्यवान दगड, मीठ, सल्फर, झिंक, लिथियम आदींचा समावेश आहे. हे सर्व साठे विचारात घेता चीनची यावर नजर नसल्यास आश्‍चर्य म्हणावे लागेल. भविष्यात या खनिजसाठ्यांची आयात-निर्यात व सहज सुलभ ऍक्‍सेसचा फायदा उचलण्यास चीन टपून आहे.

भारताला देखील अशी संधी शोधावी लागेल. विशेषतः नेपाळ, भूतान दरम्यान ही संधी आहे. शिवाय बांगलादेशाशी भारताची सलगी पाहता म्यानमार, थायलंडपर्यंत रेल्वे रूट विस्तारता येऊ शकेल. इस्लामाबाद-तेहरान-इस्तंबूल दरम्यान लोहमार्ग अंमलात येत असताना इस्तंबूल-चीन दरम्यान ट्रेन सुरू झाली आहे.जॉर्जिया, इराण व ताजिकिस्तान या देशांना याचा मोठा लाभ होईल. शिवाय इराणहून अफगाणिस्तानच्या हेरातसाठी नवी रेल्वेसेवा प्रारंभ झाली आहे. लोहमार्गाने विविध देशांना जवळ आणणाऱ्या या नव्या “ट्रेड रूट’चे विकासाचे प्रसादचिन्ह म्हणून स्वागतच करायला हवे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.