माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात टाळ-मृदंगाचा स्वर; रंगले झिम्मा फुगडीचे खेळ

– एम. डी. पाखरे

आळंदी –
माझ्या जीवीची आवडी ।
पंढरपुरा नेईन गुढी ।।

टाळ-मृदंगाचा अखंड गजर त्या तालावर डौलणारे वारकरी मनी विठुयारायाची भेटीची आस सर्वत्र भक्‍तीचा दरवळ अन्‌ या साऱ्याला लाभलेली ऊन-सावलीची साथसंगत अशा अत्यंत प्रसन्न वातावरणात पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने अलंकापुरीहून संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीने मंगळवारी (दि. 25) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. वैष्णवांची मांदियाळी व विठुनामाच्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली.

अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ।
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ।

अशा शब्दांत ज्या आळंदीचे महात्म्य वर्णितात, त्या नगरीत आज भक्तीचा महामेळाच अवतरला. विठ्ठलभक्तीच्या या शीतल वर्षावात अवघी अलंकापुरी चिंब झाली. इंद्रायणीचा घाट, समाधी मंदिर, महाद्वार, केळगाव, गोपाळपुरासह आळंदीत येणारे सर्व रस्ते वारकऱ्यांनी फुलून गेले होते. भल्या पहाटे मुख्य मंदिरात घंटानाद घणघणला आणि अवघा आळंदी गाव जागा झाला. काकड आरतीने वातावरणात प्रसन्नता दाटली. पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती आदी धार्मिक विधींनी सर्वत्र भक्तीचा गंध दरवळला. पहाटे चार ते बारापर्यंत माउलींचे समाधीदर्शन भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले. तर नऊपर्यंत भाविकांकडून पूजा झाल्या. दुपारी बारापर्यंत श्रींच्या समाधी दर्शनास गाभारा भाविकांसाठी खुला राहिला. बारा ते साडेबारा या वेळेत “श्रीं’चा गाभारा स्वच्छ करून समाधीस जलाभिषेक, महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी दोनपर्यंत “श्रीं’च्या दर्शनासाठी गाभारा खुला राहिला. “श्रीं’च्या वैभवी प्रस्थान सोहळ्यासाठी 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर “श्रीं’ना आभूषित करण्यात आले. पालखी सोहळ्यासाठी माउलींना भरजरी वस्त्र, मेखला चढविल्यानंतर चांदीचा मुकुट, सर्व दागदागिने आणि फुलांनी सजविण्यात आले.

प्रस्थान सोहळ्यातील कार्यक्रमात श्रीगुरु हैबतरावबाबा यांच्यातर्फे आरती, त्यानंतर संस्थानतर्फे श्रींची आरती करण्यात आली. विणामंडपातील पालखीत “श्रीं’च्या चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर दिंडी प्रमुख, प्रतिष्ठित मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग सुरु झाली. टाळ-मृदंग आणि ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात दिंड्यांनी महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. अंकली (बेळगाव) येथील ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांचे मानाचे अश्‍व महाद्वारातून सायंकाळी 5. 10 मिनिटांनी मंदिरात येताच पुष्पवृष्टी करण्यात आली तर टाळ-मृदंगाचा स्वर टीपेला पोहोचला. अशा भारलेल्या वातावरणातच माउलींचा जयघोष करत आळंदीकरांनी पालखी खांद्यावर घेत पंधरा मिनिटे नाचविली आणि वीणामंडपातून उचलून बाहेर आणली. तसे वारकरी आनंदाने डोलू लागले. फुगडी, झिम्मा असे विविध खेळ रंगले. खांदेकऱ्यांनी मंदिर प्रदक्षिणा,

ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली व रात्रीच्या सुमारास सोहळा जुन्या गांधीवाड्यात मुक्‍कामासाठी विसावला. पालखी सोहळ्याप्रसंगी यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम,विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर,माजी आमदार उल्हास पवार,जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, पोलीस उपायुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, सह आयुक्‍त चंद्रकांत अलसटवार,आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे पाटील, विश्‍वस्त डॉ. अभय टिळक, अजित कुलकर्णी, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, सस्थांनचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांची फुगडी
पुणे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखी सोहळ्याला उपस्थिती लावत वारकऱ्यांसमवेत टाळ-मृदंगावर ठेका धरीत फुगडी खेळायचा मोह त्यांना आवरला नाही.

सोहळा आज पुण्याकडे मार्गस्थ
माऊलींचा पालखी सोहळा बुधवारी (दि. 26) पहाटे समाज आरती घेऊन, नगरपरिषद चौकात पालखी चांदीच्या नवीन रथात विराजमान करून लाखो वैष्णवांसमवेत सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होईल. यावेळी मात्र, माऊलींना निरोप देण्यासाठी अवघ्या अलंकापुरीवासियांना गहिवरून आल्याशिवाय राहत नाही. तर बुधवारी (दि. 26) व गुरुवारी (दि. 27) पालखी सोहळा पुण्यात मुक्‍कामी असणार आहे.

पालखी, देऊळवाड्याला पुष्प सजावट
मंदिरातील पालखी व देऊळ वाड्यातील संपूर्ण पुष्प सजावट ही माऊली गुळूंजकर, अजित मधवे व मित्रपरिवाराने केली होती. यात यात विविधरंगी अशी नाना विधी प्रकारची फुले सजावटीसाठी वापरण्यात आली होती या सजावटीमुळे पालखी व देऊळ वाड्याचे रुप डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. तर या फुलांच्या सुवासामुळे परिसरात सुंगधी वास दर्वळ होता. गुळूंजकर व मधवे परिवाराला या कामी रमेश कारले, दत्ता घुंडरे, अजित मधवे, राजेंद्र गावडे, माऊली ठाकूर, माऊली कोद्रे आदींनी साह्य केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)