पुणे -‘तळजाई’ सादरीकरणाची बैठक रद्द

पुणे – तळजाई टेकडी प्रकरणी महापालिका आयुक्‍तांनी सर्वपक्षीय नगरसेवकांसमोर सादरीकरण करावे, असे स्पष्ट आदेश महापौर मुक्‍ता टिळक यांनी दिल्यानंतर आयुक्‍त सौरभ राव यांनी मंगळवारी ही बैठक बोलाविली होती. मात्र, यात वादाच्या शक्‍यतेने आयुक्‍त राव यांनीच दांडी मारल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्‍त केला. आयुक्‍तांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अनुपस्थित राहिलेल्याने नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. त्यामुळे ही बैठक रद्द करण्याची वेळ आली.

तळजाई टेकडी येथे 108 एकरमध्ये वनोद्यान उभारण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने एक आराखडाही तयार केला आहे. परंतु, येथे झाडे तोडून सध्या प्रशासनाकडून वाहनतळ उभारण्यात येत आहे. नगरसेवक सुभाष जगताप यांनी या कामाला विरोध केला. मात्र, प्रशासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे प्रभागात असे काम होत असताना स्थानिक नगरसेवकांना त्याची माहिती दिली जात नाही. या टेकडीवर पहाटे पाच वाजल्यापासून नागरिक फिरायला येतात. शहरात मोजकेच असलेले ऑक्‍सिजन पॉईंट आहेत, त्यामध्ये ही एक टेकडी आहे. त्या टेकडीवर असे बांधकाम करून तिच्यावर कॉंक्रिटचे जंगल उभारणार का, असा प्रश्‍न मुख्यसभेत नगरसेवकांनी या कामावरून उपस्थित केला होता. त्यामुळे महापौरांनी तळजाई टेकडीच्या प्रभागातील सर्व नगरसेवकांची एकत्र बैठक घेऊन सर्वांना सादरीकरण करावे तसेच त्यांच्या सूचना ऐकून घ्यावात असे आदेश दिले होते.

त्यानुसार, आयुक्‍तांनी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ही बैठक बोलविली. या बैठकीस नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेविका अश्‍विनी कदम, दिशा माने, महेश वाबळे उपस्थित राहिले. मात्र, प्रशासनाकडून आयुक्‍तांऐवजी अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल उपस्थित राहिल्या. त्यास या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. आयुक्‍तांनी या बैठकीला उपस्थित राहाणे अपेक्षित असताना, ते आले का नाहीत, त्यांना बाहेर जायचे होते तर त्यांनी महापौर तसेच नगरसेवकांना कल्पना का दिली नाही असा सवाल उपस्थित केला. त्यावर अतिरिक्‍त आयुक्‍तांना काहीच उत्तर देता आले नाही. त्यामुळे आयुक्‍तांसमोरच या विषयावर चर्चा व्हावी, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली. त्यानंतर या प्रकल्पासाठी आग्रही असलेल्या आणि प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या नगरसेवकांमध्ये या कामावरून चांगलीच शाब्दीक खडाजंगी उडाली.

Leave A Reply

Your email address will not be published.