महागणपतीला चंदन उटीचा लेप

रांजणगाव गणपती (वार्ताहर) – येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री महागणपतीच्या मुर्तीला चंदन उटीचा लेप लावल्याने श्रींचे हे देखणे रूप लक्ष वेधून घेत होते. दरवर्षी 1 मे या महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून देवस्थान ट्रस्टच्या वतीने महागणपतीला चंदन उटीचा लेप लावण्यात येतो, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर यांनी दिली.

ग्रीष्मातील वाढती उष्णता लक्षात घेऊन या काळातील तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तसेच श्रींच्या मुर्तीची दाहकता कमी व्हावी या उद्देशाने या मृदू व पवित्र चंदन उटीचा लेप लावण्यात येतो. चंदन उटीच्या लेपामुळे मूर्तीतील उष्णता शोषली जाऊन थंडावा निर्माण होतो. त्यामुळे श्रींची आल्हाददायक, प्रसन्न मनमोहक मूर्ती भाविकांना आकर्षित करते, शिवाय यामुळे मूर्तीचे आयुष्य वाढून मूर्ती दीर्घायुषी होण्यास मदत होते.

करोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून श्रींची दैनंदिन पूजा अर्चा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरु असल्याचे व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे यांनी सांगितले. पुजारी मकरंद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी यांनी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून श्रींच्या मूर्तीला चंदन उटीचा लेप लावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.