प्रशासकीय कार्यालये चोरट्यांकडून टार्गेट?

बारमती नगरपरिषदेनंतर जलतरण तलावातील कार्यालयातून रोकड लंपास

बारामती- बारामती नगरपरिषदेत 16 लाखांची रकम चोरट्यांनी लंपास केल्यानंतर 13 लाख परत नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ आणणू टाकल्यानंतरही चोरट्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. हे प्रकरण ताजे असतानाच चोरट्यांनी वीर सावरकर जलतरण तालाव कार्यालयातील 69 हजार रुपयांची रकम लांबवली आहे. ही घटना शनिवारी (दि. 6) रात्री 9 ते रविवारी (दि. 7) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, चोरट्यांनी आता प्रशासकीय कार्यालयांना टार्गेट केले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या दोन घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, तलाव कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांना बारामती शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

वीर सावरकर जलतरण तालाव व्यवस्थापक सुनील खाडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील वीर सावरकर जलतरण तलावात येथे साफसाईसाठी कार्यरत असले जितेंद्र कांबळे हे रविवारी साफसफाई करीत असताना त्यांना घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापक खाडे यांना फोनवरून हा प्रकार सांगितला. खाडे कार्यालयात आले व जलतरण तलावाच्या अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला.

दरम्यान, संचालक विश्‍वास शेळके हे जलतरण तलाव येथे दाखल झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तर कर्यालयातील 54 हजार रुपये सभासदांची वार्षिक वर्गणी तसेच शिकवू मुलांच्या मधून आले होते. 12 हजार 500 रुपये हे व्यवस्थापक खाडे यांचे वैयक्तिक होते. तर सुनील जाधव या कर्मचाऱ्यांचा पगार 2500 रुपये ड्रॉवर मध्ये होता, अशी एकूण 69 हजारांची रोकड लंपास झाली आहे. चोरट्याने टेबलच्या ड्रॉवरचे लॉक तोडून रोकड लंपास केली आहे. त्यामुळे चोरटा माहितीगार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

  • मुख्य दरवाजा बंद तरीही चोरी
    कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद अवस्थेत असला तरी तलावाच्या दिशेने जाणारा दरवाजा मात्र, उघड असल्याचे वस्तुस्थिती आहे. कार्यालयातील मुख्य टेबलच्या ड्रॉवरमधून चोरट्याने ही रोकड पळविली आहे. चोरट्याने जलतरण तलावाच्या कार्यालयाच्या दरवाज्याचा अथवा खिडकी तोडून आत येण्याचा कोणताही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद अवस्थेत होता त्याचे कडी-कोयंडा तसेच कुलूप देखील सुस्थितीत होते असे असताना चोरट्याने आतमध्ये प्रवेश कसा केला याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तर पाठीमागील बाजूस तलावाच्या संरक्षण भिंतीवरून चोरट्याने आत प्रवेश केला असावा असे मत व्यक्‍त केले जात आहे.
  • सीसीटीव्ही नाही
    चोरीचा प्रकारानंतर आज दिवसभरासाठी जलतरण तलाव बंद ठेवला होता. जलतरण तलावाच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने घडला प्रकार कॅमेऱ्यात कैद होऊ शकला नाही. ता या प्रकारानंतर कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू करण्यात आले.
  • कायदा, सुव्यवस्था राखण्यात पोलीस अपयशी
    शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील विकासामुळे राज्यातूनच नव्हे तर देशातून नागरिक बारामतीला वास्तव्यास येत आहेत. बारामतीचे नागरिकरण वाढत असल्याने बारामतीची वाटचाल महनगराच्या दिशेने होत आहे, असे असताना शांत व संयमी समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये गुन्हेगारी फोपावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कायदा सुव्यवस्था रखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. पाकीट चोऱ्यापासून खून, दरोडे, बलात्कार, रस्त्यावरून जा-ये करणाऱ्या महिलांचे दागिने दिवसाढवळ्या लंपास करण्याच्या घटना वारंवार घडत असूनही गुन्हेगारांवर जबर ठेवण्यात पोलीस अपयशी ठरले असल्याने नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.