‘प्रभात अभ्यासमाले’द्वारे गुणवंत व्हा!

रघुनाथ यादव : खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात दहावी अभ्यासमालेस प्रारंभ

पानशेत -“दैनिक प्रभात’मध्ये प्रसिद्ध होत असलेल्या “दहावी अभ्यासमालेतील’ विविध विषयांचा अभ्यास करून गुणवंत व्हा आणि शाळेचा तसेच गावाचा नावलौकिक वाढवा, असे गौरवोद्गार खानापूर येथील काळभैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ यादव यांनी काढले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात “दैनिक प्रभात दहावी अभ्यासमाला’ उपक्रमांची मंगळवारी (दि. 16) सुरूवात करण्यात आली. त्यावेळी रघुनाथ यादव बोलत होते. कार्यक्रमात मुख्याध्यापक सुनील कदम, पर्यवेक्षक राजाराम गायकर, पतसंस्थेचे खजिनदार शांताराम जावळकर, ज्येष्ठ शिक्षक शशिकांत जाधव, शिक्षक तानाजी सोलनकर व नंदन ठाकरे समवेत शिक्षक-शिक्षकेतर सहकारी, दैनिक प्रभात वितरण विभागाचे किरण रूत, भाऊसाहेब वंजारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रघुनाथ यादव म्हणाले की, 52 वर्षांपूर्वी मी याच शाळेतून शिकलो. त्यावेळी माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या आता विद्यार्थ्यांकडून होऊ नयेत, अशी माझी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दैनिक प्रभातची अभ्यासमाला उपयुक्त ठरेल. मुख्याध्यापक सुनील कदम म्हणाले की, दैनिक प्रभात अभ्यासमालेमुळे गुणात्मक वाढ होण्यास निश्‍चितच मदत होईल. यावर्षी दहावीचा निकाल 100 टक्‍के लागणार याची मला खात्री आहे.

मनिषा जाधव, आदित्य बुटाला व तेजश्री जावळकर या विद्यार्थ्यांनी सांगितले की, प्रभात अभ्यासमालेतील पुरवणी प्रश्‍नपत्रिका आम्ही नियमित वाचून त्या सोडविणार आहोत. अभ्यासमाला व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निश्‍चित यंदा 100 टक्के निकालाची खात्री देतो. शिक्षिका जोत्स्ना गुरव यांनी दैनिक प्रभातने सुरू केलेल्या उपक्रमाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत जाधव यांनी केले तर पर्यवेक्षक राजाराम गायकर यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)