पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2022 – 23 मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी. (१० वी) माध्यमिक परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने आज शुक्रवारी (दि. 2 जून) जाहीर करण्यात आला. अनेकांनी उत्कृष्ट गुण मिळवून 10वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दरम्यान, पुण्यात आई आणि मुलगा एकाचवेळी दहावी पास झाले आहेत. परिवाराकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
मोनिका तलंगे आणि मुलगा मंथन तेलंगे असे आई आणि मुलाचे नाव असून मोनिका यांना 51.8 टक्के तर मंथनला 64 टक्के गुण मिळाले आहेत. मोनिका या कचरा वेचकचे काम करतात. लहान असतानाच त्यांचा विवाह झाला होता. पुढे परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. मात्र त्यांनी या वर्षी मुलाबरोबर अभ्यास करून परिक्षा दिली आणि चांगल्या गुणाने उत्तीर्ण देखील झाल्या आहेत. हे कुटुंब पुण्यातील हडपसर परिसरात राहतात.
मोनिका यांनी सांगितले की, माझा मुलगा अभ्यास करत असताना मी पाहत होते. मलाही दहावी शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. मंथनने मला फाॅर्म भरायला लावला. आम्ही दोघेही सोबत अभ्यास करून लागलो. अखेर प्रयत्नांना यश मिळाले असून आम्ही दहावी पास झालो आहोत याचा खुप आनंद आहे. तसेच पुढेदेखील शिकण्याची इच्छा आहे. मात्र आधी मुलाचं शिक्षण पूर्ण करुन त्याला मोठं झालेलं बघायचं आहे.