पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे जोमात

माण-खटाव तालुक्यात कलेक्टरांची मोघलाई; सामान्यांच्या व्यथा ऐकणार तरी कोण?

सातारा, दि. 20 प्रशांत जाधव

माण-खटाव तालुक्यातील जनता एका बाजुला दुष्काळाने होरपळत असताना दुसर्‍या बाजुला मात्र म्हसवड, दहिवडी, वडूज पोलिसांची पाची बोटे तुपात आहेत. मटका, जुगार, दारू, वाळू, वडाप यांच्यासह इतर अनेक अवैध धंदे या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जोमात सुरू आहेत. वडूज, दहिवडीचे कारभारी नवे असले तरी कलेक्टर मात्र जुनेच असल्याने सर्व काही सुरळीत सुरू आहे. पोलिसांच्या या वागण्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्याआधीच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍यांचे या भागात चांगलेच फावले आहे. माण तालुक्यातील नदीपात्रातील वाळूचा लिलाव झालेला नसतानाही मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. दरम्यानच्या काळात सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील वाळू चोरट्यांनी निवडणुकीचा फायदा घेऊन लाखो रुपयांच्या वाळुचा अवैध उपसा केला. अर्थातच याला महसूल प्रशासनातील तालुका पातळीवरील काही अधिकारी व कर्मचार्‍यांसह पोलीस दलातील स्थानिक कारभार्‍यांची छुपी साथ असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यानच्या काळात म्हसवडला सातार्‍याच्या स्थानिक गुन्हे शाखेने, खटाव तालुक्यातील नेर, अंबवडे, मायणी या भागात सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने मोठी कारवाई केल्याने या भागातील कारभारी नेमके काय करत असतील याचा अंदाज आल्यावाचून राहत नाही. म्हसवड तर तीन जिल्ह्याला जोडणारे केंद्र असल्याने या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल होताना दिसते.

आमच्या पोलीस ठाण्यात अवैध धंदे बंद असल्याचे सांगणार्‍या म्हसवडच्या कारभार्‍यांचा एलसीबीच्या पथकाने तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशाने काही महिन्यापुर्वी वाळूची मोठी कारवाई करून सोज्वळपणाचा बुरखा फाडला होता. मात्र, आपला प्रशासनात मोठा वशीला असल्याचे सांगत कोणी काहीही केले तरी आपल्याला फरक पडत नसल्याचेही त्यांनी त्यावेळी खासगीत सांगितले होते.

म्हसवड, वडूज, दहिवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वडाप, वाळू, मटका, जुगार यासह सामान्य लोकांच्या जिवाशी खेळ करणार्‍या हातभट्टीचा व्यवसाय मोठ्या तेजीत असल्याचे चित्र आहे. अवैध धंद्यांसाठी पोलिसांनी स्वत:चे दरपत्रकच तयार केले आहे. वडापची वाहतूक करणार्‍या वाहनांसाठीचे दरपत्रक पुढीलप्रमाणे कसांत प्रत्येक वाहनाची प्रति महिन्याची हप्त्याची रक्कम, वडूज ते मायणी ( 400 रुपये), वडूज ते पुसेगाव (500 रुपये), दहिवडी ते म्हसवड (700 रुपये), मायणी कलेढोण (300 रुपये), वडूज दहिवडी (500 रुपये) तर वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांचे दरपत्रक पुढीलप्रमाणे कंसात महिन्याची रक्कम डंपर किवा ट्रक (10 हजार), वाळू उत्खनन करणारी जेसीबी मशिन (20 हजार) छोटा हत्ती किवा पिकअप गाडी (7 हजार), ट्रॅक्टर (5 हजार) असे हे हप्त्यांचे आकडे ठरलेले आहेत.

त्यामुळेच एलसीबीला किवा पोलीस अधीक्षकांना हे धंदे दिसतात. पण या पोलीस ठाण्यांच्या कारभार्‍यांना दिसत नसल्याचे बोलले जात आहे. पोलीस अधिकारी येतात जातात पण कलेक्टर वर्षानुवर्षे त्याच त्या भागात असल्याने त्यांचेच पावशेर जस्तीचे दिसून येते. पोलीस दलात अनेक कर्मचारी व अधिकारी शिस्तीने आपले कर्तव्य बजावतात. मात्र, काही जण कलेक्टर म्हणून काम करत आहेत.

महागडे कपडे, शूज तसेच सुंगधी अत्तर मारलेला कोणी कर्मचारी दिसला तर त्याला पोलीस दलाच्या भाषेत कलेक्टर या नावाने ओळखले जाते. या कलेक्टरांमुळे अनेक वर्षे अंगावर खाकी चढवून गुन्ह्यांचा तपास, छाती पुढे करून दिवसरात्र बंदोबस्त करणार्‍या इमानी पोलिसांची छाती दोन इंच आत गेल्याची कळकळ काही सामान्य पोलिस व्यक्त करत आहेत. खरे तर हा कलेक्टरचा आजार जिल्ह्यातच पसरल्याचे चित्र आहे.

काही पोलीस ठाण्यांवर तीन दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन वरिष्ठांवर छाप उमटवण्यासाठी या कलेक्टरांनी जीव की प्राण एक केला आहे. साहेबांची राहण्याची व्यवस्था, डब्याची सोय, पोलीस ठाण्याच्या परिसरात जे आर्थिकस्रोत आहेत, अशा स्रोतांची अपडेट यादी अशी माहिती या कलेक्टरांनी पुरविल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दर महिन्याला मिळालेल्या सिंडिकेट (महिन्याचा हप्ता) मधून बाकी सगळे भागवले जाते. कलेक्टरांच्या मायेची ही कक्षा पोलीस ठाण्यापासून ते उपविभागीय अधिकार्‍यांच्या कार्यालयांपर्यंत रुंदावली आहे. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी ज्या पध्दतीने या पोलीस ठाण्यांची माहिती जिल्हा विशेष शाखेमार्फत गोळा करून कारभार्‍यांना इंगा दाखवला होता तसाच इंगा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. नाही तर एखादा दिवस हे अवैध धंदेवाले कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत.

…किती आहेत हातभट्ट्या
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 23 गावात, दहिवडीच्या हद्दीत 9 गावात, वडूजच्या हद्दीत 4 गावात हातभट्ट्यांचे अड्डे आहेत.

कारवाईपेक्षा खांदेपालट गरजेची
या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेली बेदीली पाहता भविष्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारभार्‍यांवर किंवा कलेक्टरांवर कारवाई अपेक्षीतच आहे पण त्यापेक्षा खांदेपालट हाच रामबाण उपाय ठरेल.

पुण्याचा प्रयोग सातार्‍यात होणार का?
पुणे ग्रामीण पोलीस दलातील जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काही दिवसापुर्वीच एका रात्रीत एकूण 85 कलेक्टर मुख्यालयात हजर करून घेतले. असाच प्रयोग सातार्‍यात झाला तर एसपी, अ‍ॅडीशनल एसपींच्या स्तरावरून सुरू असलेल्या उत्कृष्ठ कामगिरीला बट्टा लावण्याचे काम करणार्‍यांची धुंदी उतरण्यास मदत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.