पश्‍चिम बंगाल कॉंग्रेसमधील बेबनाव चव्हाट्यावर

निषेध मोर्चापासून महत्वाचे नेते राहिले दूर

कोलकता- पश्‍चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचा आरोप करत कॉंग्रेसने गुरूवारी येथे निषेध मोर्चा काढला. मात्र, त्या मोर्चापासून पक्षाचे अनेक महत्वाचे नेते दूर राहिले. त्यामुळे प्रदेश कॉंग्रेसमधील बेबनाव चव्हाट्यावर आला.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अब्दुल मन्नन यांच्या नेतृत्वाखाली त्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार थांबवण्यासाठी पाऊले उचलली जावीत, या मागणीसाठी तो मोर्चा काढण्यात आला. मात्र, खुद्द कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा, ज्येष्ठ नेत्या दीपा दासमुन्शी यांसारखे महत्वाचे नेते त्या मोर्चात सहभागी झाले नाहीत. कॉंग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाच्या परवानगीविना तो मोर्चा काढण्यात आल्याचे पक्षातील सुत्रांनी सांगितले.

त्यामुळे प्रदेश कॉंग्रेसमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची देशभरात पीछेहाट झाली. पक्षाच्या पश्‍चिम बंगालमधील कामगिरीत यावेळी मागील वेळेपेक्षाही घसरण झाली. त्यामुळे पश्‍चिम बंगाल कॉंग्रेसमधील उखाळ्यापाखाळ्या वाढल्याचे वृत्त आहे. इतर बऱ्याच राज्यांमध्येही कॉंग्रेसच्या प्रदेश शाखांमध्ये अस्वस्थता असल्याचे याआधीच उघड झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.