पुणे – पालेभाज्यांवर “महागाईचा पाऊस’

उत्पादनासह आवकही घटली : किरकोळ बाजारात जुडीसाठी 20 रुपयांचा भाव

पुणे – दुष्काळाचा परिणाम पालेभाज्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्यामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागात अपेक्षित आवक होत नाही. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात पालकवगळता सर्व पालेभाज्यांच्या एका जुडीचे 20 किंवा त्यापेक्षा अधिक रुपये मोजावे लागत आहेत.

“गेल्या वर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्याने मोठा परिणाम झाला. जानेवारीपासून पुण्यासह राज्याच्या सर्व विभागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जलस्रोत आटल्यामुळे फळभाज्या तसेच पालेभाज्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. यंदा राज्यात उन्हाचा कडाका वाढला. बहुतांश जिल्ह्यांत पारा 40 अंशापुढे गेल्याने फळभाज्यांच्या प्रतवारी तसेच उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव गेल्या महिनाभरापासून चढे आहेत,’ अशी माहिती किरकोळ बाजारातील फळभाजी व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री शिवाजी मार्केटयार्डात राज्याच्या वेगवेगळ्या भागांसह पुणे विभागातून फळभाजी तसेच पालेभाज्यांची आवक होती. पुणे जिल्ह्यातील चाकण, मंचर, खेड, उरूळी कांचन, हडपसर भागातून पालेभाज्यांची आवक होते. पालेभाज्यांचे उत्पादन कमी आणि त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा पालेभाज्यांची लागवड करण्यात येईल. साधारणपणे महिन्याभरानंतर पालेभाज्यांचे पीक हाती येईल. त्यानंतर पालेभाज्यांचे भाव कमी होतील. “पावसाळ्यात पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम होतो. पावसामुळे पालेभाज्या खराब होतात. त्यामुळे पावसाळ्यात पालेभाज्यांना विशेष मागणी नसते,’ असे निरीक्षण ढमढेरे यांनी नोंदविले. तर, “मागील महिन्यापासूनच घाऊक बाजारात पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. साहजिकच किरकोळ बाजारात जास्त भावाने विक्री होत आहे,’ असे मार्केट यार्डातील व्यापारी विलास भुजबळ यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.