पुणे जि.प.च्या सर्वसाधारण सभेत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना धरले धारेवर

पुणे – जिल्हा परिषदेच्या शाळांना निकृष्ट दर्जाच्या लेझीम पुरविणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई केली? समाजकल्याण विभागाकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविले, “त्या साहित्यांची चौकशीचे काय झाले, आम्ही काय फक्त सह्या करण्यासाठी आहोत का? प्रत्येकवेळी तुम्ही दबावतंत्र वापरता, असा संताप व्यक्त करत सदस्यांनी एकापाठोपाठ एक प्रश्‍नांचा भडिमार करत प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना “लेझीम आणि तुणतुण्या’च्या साहित्य खरेदीच्या मुद्यावरून पुरते सळो की फळो करून सोडले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना क्रीडा साहित्य पुरविण्याच्या नावाखाली 50 लाख रूपयांची “लेझीम’ खरेदी करण्यात आली. मात्र, हे लेझीम निकृष्ट दर्जाचे असून संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करून लेझीम बदलून घ्यावे, अशी सूचना भाजपा गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी सर्वसाधारण सभेत केली. त्याचवेळी देवीदास दरेकर यांनीही समाजकल्याण विभागाकडून देण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी दोन्ही प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिले होते. या घटनेला तीन महिने झाले तरीही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे निदर्शनास आले.

त्याबाबत शिक्षणाधिकरी यांच्या जाब विचारला असता, लेझीम बदलून दिले आहे आणि कारवाईही केली, असे सांगत बुट्टेपाटील यांचा पारा वाढला “कोणत्या शाळांना लेझीम बदलून दिले सांगा. तुम्ही ठेकेदाराला का पाठीशी घालता, त्याच्यावर कारवाई का करत नाही, सभा संपेपर्यंत लेझीम बदलून दिलेल्या शाळांची यादी मला द्या, असे म्हणताच अधिकारी देतो म्हणाले परंतु शेवटपर्यंत यादी आलीच नाही. देवीदास दरेकर यांनी समाजकल्याण विभागाकडून दिलेले वाद्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे चौकशी अहवालातून समोर आले. मात्र, वाद्य तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी वाद्य चांगले असल्याचे सांगितले.

तर आंदोलन करू : दरेकर
मुळात ज्या अधिकाऱ्यांना वाद्यांविषयी माहितीच नाही, असे अधिकारी वाद्यांची काय तपासणी करणार? आम्ही काय फक्त सह्या करण्यासाठी आहे का? प्रत्येकवेळी आमच्यावर दबावतंत्र वापरणार असणार तर आम्ही शांत बसणार नाही. येत्या महिन्याभरात या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली नाही तर मुंबई येथील मंत्रालयासमोर आंदोलनाला बसेल, असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.