पुणे – आवक वाढली, पण आंबा रूसलेलाच

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर तयार आंब्याचा तुटवडा


भाव अद्याप सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर


सध्या तरी कर्नाटक हापूसचाच गोडवा

पुणे – अक्षय्य तृतीया येत्या मंगळवारी (दि.7) आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डात आंब्याला मागणी वाढली आहे. तरीही रत्नागिरी हापूसची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे रत्नागिरी हापूसचे भाव अद्यापही सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्‍याबाहेरच आहेत. परिणामी, “रत्नागिरी’ऐवजी कर्नाटक आंब्याची खरेदीच नागरिकांना करावी लागली.

कर्नाटक तयार हापूस 300 ते 500 रुपये डझनाने मिळत असून, रत्नागिरी हापूसचे भाव 500 ते 700 रुपये डझन असल्याचे रत्नागिरी हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी नागरिकांनी मार्केट यार्डात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. अक्षय तृतीयेमुळे मागणी जास्त असल्याने आंब्याचे भाव देखील वाढतात. परंतु यंदा सुरुवातीपासूनच रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे भाव अधिकच आहेत. सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मार्केट यार्डामध्ये आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे. परंतु यामध्ये रत्नागिरी तयार हापूस मात्र मागणीच्या तुलनेत कमी आहे. यामुळे कच्च्या आंब्याची आवक वाढून देखील हापूसचे भाव मात्र कमी झाले नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रविवार (दि.5) रोजी रत्नागिरी हापूस कच्च्या आंब्याची सुमारे 10 ते 12 हजार पेट्या आवक झाली.

दरम्यान कर्नाटक हापूस आंब्याच्या तब्बल 18 हजार ते 20 हजार पेट्यांची आवक झाली. गेल्या तीन-चार दिवसांत ही आवक 25 ते 30 टक्क्‌यांनी वाढली असून, भावामध्ये 20 ते 25 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले. यामुळे किरकोळ बाजारामध्ये प्रतवारीनुसार कर्नाटक हापूस आंबा 250 ते 500 रुपये डझन पर्यंत भावाने मिळत आहे.

आंब्याचे भाव (हापूस)
रत्नागिरी हापूस (कच्चा) : 4-8 डझन 1,200 ते 2,800 रुपये
रत्नागिरी हापूस (तयार) : 4-8 डझन 1,500 ते 3,000 रुपये
कर्नाटक हापूस (कच्चा) : 4-5 डझन 500 ते 1,000 रुपये
कर्नाटक हापूस (तयार) : 4 -5 डझन 1,200 ते 1,500 रुपये

आंब्याचे भाव (हापूस)
पायरी : 4 डझन- 400 ते 800 रुपये
लालबाग : 20 ते 30 रुपये किलो
बदाम : 30 ते 40 रुपये किलो
तोतापुरी : 20 ते 35 रुपये किलो
मलिका : 35 ते 45 रुपये किलो

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.