‘टेमघर’ची दुरुस्ती वेगाने : गळती थांबणार

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरण दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील धरणाच्या भिंतीची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरण केले जात आहे. यामुळे धरणातील गळती थांबण्यास मदत होणार आहे.

टेमघर धरण दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान व साहित्य सामुग्रीचा वापर करण्यात येत असून धरण दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मोठ्या प्रमाणात धरणाची दुरुस्ती करण्याची राज्यासह देशात ही पहिलीच घटना आहे. टेमघर धरण दुरुस्तीकडे केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान केंद्र (सीडब्लूपीआरएस) विशेष लक्ष देत असून याकडे पथदर्शी प्रकल्प म्हणोन पाहिले जात आहे.

टेमघर धरण बांधण्याचे काम 2001 मध्ये पूर्ण झाले. टेमघर धरणाची एकूण क्षमता पावणेचार टीएमसी इतकी आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 15 वर्षांत धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे धरण दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. धरणात पानी असताना हे काम करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे यंदा सर्वांत आधी टेमघर धरणातील पाणी पिण्यासाठी खडकवासला धरणात सोडण्यात आले. धरण रिकामे झाल्यानंतर धरण दुरुस्तीच्या कामास वेग आला.

टेमघर धरण दुरुस्तीचे काम मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. धरण दुरुस्तीच्या कामांमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ड्रीलींग व ग्राऊटींग या पद्धतीने धरणाच्या बाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये 90 अंशाच्या कोनात ड्रीलच्या सहाय्याने छिद्र पाडले जाते. यानंतर या छिद्रामध्ये सिमेंट, सिलिका, फ्लॅश ऍशसोबतच दोन द्रवस्वरुपातील पदार्थ असे एकूण सहा पदार्थांचे मिश्रण या छिद्रामध्ये प्रेशरच्या सहाय्याने सोडले जाते. यामुळे गळती थांबण्यास मदत होते. धरण दुरुस्तीचा हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात धरणाची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरणाचे काम सुरू आहे. टेमघर धरणाची उंची 86 मीटर तर लांबी 1075 मीटर आहे. एवढ्या भागामध्ये सिमेंट आच्छादीकरण केले जाणार आहे.

दुरुस्तीसाठी 100 कोटी रु. खर्च
टेमघर धरण दुरुस्तीसाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या गळतीबाबत ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलल्याने सुरुवातीला कोणत्याही कंपनीने धरण दुरुस्तीच्या कामास प्रतिसाद दिला नाही. तीन वेळा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एका ठेकेदार कंपनीने पुढाकार घेत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार धरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. टेमघर धरण बांधायला सुमारे 252 कोटी रुपये खर्च आला होता. मात्र, गळती रोखण्यासाठी तब्बल शंभर कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी गेल्या दोन वर्षांत 45 कोटी रुपये खर्च झाले असून, अजूनही 55 कोटी रुपयांचे काम करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.