पाकिस्तानच्या निर्मीतीला कॉंग्रेसच जबाबदार – मोदी

औसा – पाकिस्तानच्या निर्मीतीला कॉंग्रेसच जबाबदार असून त्यावेळी कॉंग्रेसचे नेते हुशारीने वागले असते तर आज पाकिस्तानची निर्मीतीच झाली नसती अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज महाराष्ट्रात लातुर जवळील औसा येथे एका जाहीर सभेत बोलत होते. बालाकोट येथे एअरस्ट्राईक करणाऱ्या राजकीय पक्षालाच आपले मत द्या असे आवाहन त्यांनी युवकांना केले.

मोदींनी यावेळी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात पाकिस्तानचीच भाषा दिसून येते. ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्‍मीरसाठी वेगळा पंतप्रधान नेमण्याची मागणी केली आहे त्याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अशा पक्षाच्या बरोबर बसत आहेत, त्यांच्या बरोबर ते निवडणूका लढवत आहेत. पवारांना उद्देशून ते म्हणाले की पाकिस्तनाची भाषा बोलणाऱ्या पक्षाबरोबर तुम्ही आघाडी कशी करता?. दहशतवाद्यांना आम्ही त्यांच्या घरात घुसून मारले असा दावाही त्यांनी यावेळी बालाकोट हल्ल्याच्या संबंधात केला. हा नवा भारत आहे. तो आता दहशतवाद खपवून घेणार नाही असेही मोदींनी यावेळी सांगितले. कॉंग्रेसच्या लोकांनी केवळ प्रामाणिकपणे एकच काम केले आहे ते म्हणजे भ्रष्टाचार.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यप्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या संबंधीतांवर छापे घालून कोट्यवधी रूपयांची रोकड जप्त केल्याचा दावा केला जात आहे त्या पार्श्‍वभूमीवर मोदी म्हणाले की मागचे सहा महिने ते चौकीदार चोर है म्हणत होते पण आता त्यांच्या कडूनच नोटा बाहेर निघत आहेत. आता असली चोर कोण आहे असा सवालही त्यांनी केला.

पाकिस्तान आणि कॉंग्रेसची भाषा एकच आहे असा दावा करताना ते म्हणाले की लष्कराला देण्यात आलेला विशेषाधिकार रद्द करण्याची भाषा कॉंग्रेस बोलत आहे, पाकिस्तानची तीच भाषा आहे. देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसने दिले आहे, पाकिस्तनाची तीच इच्छा आहे. असे लोक देशाची सुरक्षा करण्यास सक्षम आहेत काय असा सवालही मोदींनी उपस्थितांना केला. लातुर जिल्हतील मोदींच्या या सभेला शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.